Raksha Bandhan 2019 : अनोखे रक्षाबंधन... बहिणीच्या यकृतामुळे भावाला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

काविळीमुळे भावाचे यकृत काम करेनासे झाल्यावर अखेर बहिणीने त्याचा जीव वाचवला. आपल्या यकृताचा एक तुकडा देऊन तिने त्याच्यावर जीव ओवाळून टाकला. 

रक्षाबंधन 2019
मुंबई :
वडिलांच्या पश्‍चात आपले रक्षण करणाऱ्या आणि आपल्याला सांभाळणाऱ्या भावाच्या जीवावर बेतले तेव्हा एका वेड्या बहिणीची वेडी माया त्याला जीवदान देऊन गेली. शीतल साठवणे यांनी आपल्या यकृताचा तुकडा देऊन भावाचे प्राण तर वाचवलेच; पण समाजाला एक आदर्श घालून दिला. ठणठणीत बरे झालेले सुशांत बोराटे आणि शीतल यांच्यासाठी यंदाची राखीपौर्णिमा आगळीवेगळीच ठरणार आहे. 

सुशांत बोराटे (वय 41) यांना गेल्या वर्षी कावीळ झाल्याने त्यांची तब्येत बिघडत गेली. त्यांचे यकृत काम करीत नसल्याने यकृतरोपणाचा एकमेव पर्याय होता. त्यासाठी ते नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल झाले. मेंदूमृत व्यक्तीचे यकृत मिळण्यास वेळ लागत होता. दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती खालावत चालली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनीच यकृत दान करण्याचे ठरवले. मात्र, त्यांच्या आईचे वय आणि प्रकृती यामुळे तिला यकृत दान करणे शक्‍य नव्हते. त्यामुळे त्यांच्या बहिणीने त्यांना यकृत देण्याचा निर्णय घेतला. शीतल यांच्या पतीनेही त्यांच्या निर्णयास संमती दिल्यानंतर यकृतदानाची शस्त्रक्रिया झाली. 

जिवंत व्यक्तीकडून यकृत घेताना त्याचा छोटासा तुकडा काढून त्याचे रुग्णाच्या शरीरात रोपण केले जाते. छोटासा तुकडाच काढल्याने दात्याचे उरलेले यकृत काही काळाने तो काढलेला भाग जवळपास संपूर्णपणे भरून काढते व दात्याचे यकृत पूर्वीसारखेच काम सुरू करते. सामान्यतः शस्त्रक्रियेनंतर दात्याला आठवड्याभरातच घरी सोडले जाते. महिना-दीड महिन्यानंतर तो आपली नेहमीची सर्व कामे करू शकतो, असे रुग्णालयाचे सर्जन विक्रम राऊत यांनी सांगितले. 

मी जगण्याची आशाच सोडून दिली होती... 
सुशांत बोराटे यांच्यावर जानेवारी महिन्यात शस्त्रक्रिया झाली. आता भावा-बहिणींचे दैनंदिन जीवनही पूर्ववत सुरू झाले आहे. मी जगण्याची आशाच सोडून दिली होती; पण बहिणीने यकृत दान केल्यामुळे मला नवे जीवनच मिळाले, अशा भावना सुशांत यांनी व्यक्त केल्या. 

भावाने दिली वडिलांची माया
"आमचे वडील लहानपणीच वारले. तेव्हा भावानेच मला वडिलांसारखा खंबीर आधार दिला. आता त्याच्यासाठी काहीतरी करण्याची माझी वेळ होती आणि त्याला वाचविण्यासाठी मी यकृतदान केले,' असे शीतल म्हणाल्या. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sister donates liver to save her brother lives, in navi mumbai