माणुसकी संपली...कोरोनाच्या भीतीने बहिणीने भावाला घरातच केले बंदिस्त!

सचिन सावंत
Sunday, 5 April 2020

दहिसर (पश्चिम) कांदरपाडा येथे एका बहिणीने आपल्या सख्या भावाला कोरोनाच्या भीतीमुळे घरांमध्ये बंदिस्त करून पळ काढल्याचे समोर आले आहे.

मुंबई : दहिसर येथे झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकाच कुटुंबातील नागरिकही एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. यातून काही धक्कादायक प्रकारही समोर येत आहेत. 

दहिसर (पश्चिम) कांदरपाडा येथे एका बहिणीने आपल्या सख्या भावाला कोरोनाच्या भीतीमुळे घरांमध्ये बंदिस्त करून पळ काढल्याचे समोर आले आहे. कांदरपाड्यातील एका चाळीत हे बहिण-भाऊ एकत्र रहायचे. काही दिवसांपूर्वी भावाची तब्येत खराब असल्याने त्याला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला ताप आणि कफचा त्रास होता. दोनच दिवसांपूर्वी त्याला बहिणीने एका रुग्णवाहिकेतून घरी आणले. त्यानंतर त्याला घरात एकटे ठेवत बाहेरून लाॅक लावून बहिण निघून गेली, अशी माहिती या चाळीतील नागरिकांनी दिली. व्यक्तीला ताप आणि कफ असल्याने घाबरलेल्या रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांना याबाबत माहिती दिली.

नगरसेविकेने ताबडतोब पोलिस आणि पालिकेच्या आर/उत्तर विभागातील सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्क साधत पालिकेच्या रुग्णवाहिकेतून त्याला बोरिवलीतील भगवती रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला; मात्र भावाला एकटे सोडून पळ काढणाऱ्या बहिणीविषयी रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. 

महत्त्वाची बातमी...
आता जहाजावर केले जाणार क्वारंटाईन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sister locked brother in house for fear of Corona!