मुंबईत  मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे 6 जण अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

पनवेल व आजूबाजूच्या परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी व स्कूटीची चोरी करणाऱ्या सहा तरुणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. यात 4 अल्पवयीन मुलांचा समावेश असून, हे सर्व जण मौजमजा करण्यासाठी दुचाकी व स्कूटी चोरत असल्याचे तपासात समोर आले आहे.

नवी मुंबई - पनवेल व आजूबाजूच्या परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी व स्कूटीची चोरी करणाऱ्या सहा तरुणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. यात 4 अल्पवयीन मुलांचा समावेश असून, हे सर्व जण मौजमजा करण्यासाठी दुचाकी व स्कूटी चोरत असल्याचे तपासात समोर आले आहे.

त्यानुसार पोलिसांनी या तरुणांकडून चोरीच्या 12 वाहनांपैकी 7 वाहने हस्तगत केली; तर उर्वरित 5 वाहने पोलिसांना बेवारस स्थितीत सापडली आहेत. या तरुणांनी केलेले 12 गुन्हे उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

पनवेल भागातून दुचाकी व स्कूटी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पनवेल शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिस उपनिरीक्षक सुनील तारमळे व त्यांच्या पथकाने गुप्त बातमीच्या आधारे दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सुशील म्हस्के (25) आणि संतोष कांबळे (18) या दोघांसह 4 अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे तरुण मौजमजेसाठी दुचाकी व स्कूटी स्क्रू-ड्रायव्हर व कटरच्या साह्याने चालू करून चोरून नेत असल्याचे; तसेच त्यातील पेट्रोल संपल्यानंतर ते वाहन त्याच ठिकाणी सोडून देत असल्याचे तपासात आढळून आले. त्यानुसार या तरुणांनी विविध ठिकाणांवरून चोरलेली 7 दुचाकी वाहने त्यांच्याकडून हस्तगत केली आहेत. तसेच या तरुणांनी चोरून नेलेली व पेट्रोल संपल्यानंतर बेवारस स्थितीत सोडलेली 5 दुचाकी वाहने पोलिसांनी त्या-त्या ठिकाणावरून ताब्यात घेतली. 

Video : अजित पवार म्हणतात, चिंता नको; देवेंद्रसोबत हवापाण्याच्या गप्पा मारल्या

पोलिस कोठडीत रवानगी 
पोलिसांच्या चौकशीत या तरुणांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत-10, सानपाडा व खारघर या दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी-1 दुचाकीचोरीचा गुन्हा केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुशील म्हस्के व संतोष कांबळे या दोघांची न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी करण्यास सांगितले आहे; तर उर्वरित 4 विधीसंघर्षग्रस्त बालकांची कर्जत येथील बालनिरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six arrested for burglary in Mumbai