
ठाणे पालिकेने शहरातील सहा कोविड रुग्णालये बंद केलीत. यामध्ये पाच खासगी रुग्णालयांसह महापालिकेच्या 400 बेडच्या कोविड सेंटरचाही समावेश आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी सुरु करण्यात आलेले तीन सेंटरही बंद करण्यात आली.
मुंबईः दिवसेंदिवस ठाणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट तर, दुसरीकडे शहरातील बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट आणि नुकताच बाधित रुग्णांची संख्या तीन अंकावरून दोन अंकी झाल्याने ठाणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. असे असले तरी, शहरातील कोविड सेंटर बंद केले जाणार नाहीत, असा दावा पालिकेकडून करण्यात आला होता.
मागील काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोडावल्याने तर, अनेक रुग्णालयात रुग्णच नसल्याने अखेर पालिकेने शहरातील सहा कोविड रुग्णालये बंद केलीत. यामध्ये पाच खासगी रुग्णालयांसह महापालिकेच्या 400 बेडच्या कोविड सेंटरचाही समावेश आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी सुरु करण्यात आलेले तीन सेंटरही बंद करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर कालांतराने या रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ यामुळे आरोग्य विभागावर ताण वाढत जात होता. त्यात ऑक्टोबर महिन्याच्या अखेर पासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही कमी होताना दिसत आहे.
अधिक वाचाः कल्याणमधल्या पत्रिपुलासाठी मेगाब्लॉक जाहीर, नागरिकांचे होणार हाल
आजच्या घडीला शहरात प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आत आहे. प्रतिदिन नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील दीडशेच्या खाली आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील 94 टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. त्यात आता लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या काहीशी दिसत असून त्यामुळे मृत्यूदरही खाली आला आहे. असे असले तरी भविष्यात कोरोनाची लाट येऊ शकते त्यादृष्टीने शहरातील एकही कोविड सेंटर बंद केले जाणार नसल्याचा दावा पालिकेकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आणि अनेक रुग्णालयात रुग्णच आढळून येत नसल्यामुळे खाजगी रुग्णालयांनी नॉन कोविड रुग्णालयासाठी परवानगी मागण्यास पालिकेकडे सुरुवात केली आहे.
आता मागील काही दिवसात पालिकेने शहरातील पाच खाजगी रुग्णालयातील कोविड सेंटर बंद केलेत. यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या एकूण 34 कोविड सेंटरपैकी आता सहा कोविड रुग्णालये बंद करण्यात आली आहेत. यामध्ये मुंब्य्रातील काळसेकर 100 बेड, आरोग्यम 50, वेल्यम 24, स्वास्तिक 25, मॉ वैष्णवी 20 आणि महापालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेले बुश कंपनी येथील 400 बेडचे कोविड सेंटर असे एकूण 619 बेड सध्या बंद करण्यात आले आहेत. त्याच बरोबर ज्या रुग्णांना कोरोनाची कोणतेही लक्षणो नव्हती, अशा रुग्णांसाठी पालिकेने भाईंदर पाडा आणि हॉराईझन स्कूलचा पर्याय ठेवला होता. मात्र आता भाईंदर पाडा येथील ए आणि सी वींग मधील 700 बेडचे हे सेंटर बंद केले आहे. हॉराईझन स्कूलमधील 250 बेडचे सेंटरही बंद केले आहे.
अधिक वाचा- यंदाची ग्रीन दिवाळी, मुंबईत ध्वनी प्रदूषणाचा सर्वात निच्चांक
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांसाठी ठाणे महापालिकेने रुग्णालयांबरोबरच पालिकेने शहरातील काही हॉटेल्स देखील यासाठी ठेवली होती. मात्र आता रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दोन हॉटेल वगळता इतर सात हॉटेल कोरोना रुग्णांसाठी बंद केली आहेत.
परिवहनच्या बसेसच्या रुग्णवाहिका बंद
कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळाव्या या उद्देशाने पालिकेच्या माध्यमातून काही खाजगी, पालिकेच्या काही आणि परिवहन सेवेच्या बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेमध्ये केले होते. मात्र आता पालिकेने परिवहनच्या 80 बसेस पुन्हा दिल्या आहेत. तसेच काही खासगी रुग्णवाहिका देखील बंद केल्या आहेत.
दिवसेंदिवस शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यात क्वॉरन्टाइन सेंटरमध्येही ठेवण्यात आलेल्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळेच सहा कोविड सेंटर आणि काही क्वॉरन्टाइन सेंटर बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी, दुसरी लाट जरी आली तरी त्याचा सामना करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
डॉ. आर. मुरुडकर, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठाणे महानगरपालिका
--------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
six Covid centers and quarantine center closed in Thane