esakal | चिमुकलीने असं काही केलं की सगळे पाहतच राहिले!
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पाॅकेटमनी देताना समृद्धी गाेडसे

अवघ्या सहा वर्षांच्या मुलीने आपल्या पिगी बँकेत साठवलेले पावणेतीन हजार रुपये कोरोनाविरोधातील लढ्यासाठी दान केले 

चिमुकलीने असं काही केलं की सगळे पाहतच राहिले!

sakal_logo
By
दिनेश गोगी

उल्हासनगर ः अभ्यास, वक्तृत्व आणि खेळात पारंगत असलेल्या आणि तेवढ्याच हळव्या मनाच्या उल्हासनगरमधील अवघ्या सहा वर्षीय विद्यार्थिनीने कोविडच्या लढ्यासाठी आपल्या पॉकेटमनीचे योगदान देऊन खारीचा वाटा उचलला आहे. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे तिने आपला पॉकेटमनी सुपूर्द केला. विशेष म्हणजे, तिने आपली पिगी बॅंक देशमुख यांच्या दालनात उघडून त्यातील पै अन् पै मिळून पावणेतीन हजाराची रक्कम त्यांच्या हाती सोपवली. देशमुख यांनीही स्मित हास्याने तिचे कौतुक केले.
 
हे वाचलं का? : तुमच्या-आमच्या EMI सर्वात मोठी बातमी!

कौतुकास पात्र ठरलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे, समृद्धी. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांची ती एकुलती एक कन्या. होली फॅमिली शाळेत सिनिअर केजी मध्ये असणाऱ्या समृद्धीला तिचे आजोबा, आजी, वडील आणि आई अधूनमधून पॉकेटमनी देतात. ते पैसे ती आपल्या पिगी बॅंकेत जमा करते. 

हे्ही वाचा : `न यहाॅ रहने कि चाह, न गाव जाने कि  राह` 

हळवं मन पिगी बॅंकेकडे धावलं!
 
प्रदीप गोडसे राजकारणाशी निगडित असल्याने घरातील टीव्हीवर अनेकदा बातम्या सुरू असतात. अशातच एके दिवशी समृद्धीचे लक्ष `कोविडच्या लढ्यासाठी मदतीचा ओघ` अशा बातमीकडे गेले. तिने ती बातमी गांभीर्याने बघितली. त्यानंतर तिचे पाय तिने ठेवलेल्या पिगी बॅंकेकडे वळले. पिगी बॅंक घेऊन ती वडिलांसमोर उभी राहिली. `पप्पा, यातील पैसे द्या कोरोना रुग्णांसाठी` असे आग्रह तिने धरला. चिमुकलीच्या तोंडून हे शब्द ऐकून प्रदीप अवाक् झाले. त्यांनी ताडीने आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर समृद्धीला घेऊन ते आयुक्तांच्या दालनात गेले. आयुक्तांच्या समक्षच समृद्धीने पिगी बॅंक उघडली. हळूहळू त्यातील पावणेतीन हजार रुपये काढून टेबलावर ठेवले तेव्हा आयुक्तही तिच्याकडे कौतकाने पाहत होते.