इमारतीचा स्लॅब दवाखान्यावर कोसळला; तिघांचा मृत्यू

इमारतीचा स्लॅब दवाखान्यावर कोसळला; तिघांचा मृत्यू

उल्हासनगर : कॅम्प क्रमांक तीनमध्ये मेमसाब या पाच मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या व पहिल्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावरील खाजगी दवाखान्यावर कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहाजण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली आहे. त्यात एक वयोवृद्ध महिला आणि काकी-पुतनीचा समावेश आहे.

इंदिरा गांधी भाजी मार्केट भाऊ गोप बहरानी चौकाजवळ मेमसाब ही पाच मजल्याची इमारत असून, ती 30 वर्षांपूर्वी उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिझवानी यांचे बंधू डॉ. ब्रिजलाल रिझवानी यांचे साई आशीर्वाद क्लिनिक आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास क्लिनिकमध्ये 10-12 रुग्ण आले असताना इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या आणि पहिल्याचा स्लॅब तळमजल्यावरील दवाखान्यावर कोसळला. त्यात वयोवृद्ध महिला नीतू सदिजा, अनिता मौर्या 25 व त्यांची पुतणी प्रिया मौर्या यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. ब्रिजलाल रिझवानी, हिरा खानचंदानी 90, पेहलाज खानचंदानी-50, नीना मेघानी 50, वंदना मौर्या 5, खुशी मौर्या 4 हे सहा जण जखमी झाले. त्यांना खाजगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना समजताच पालिकेचे मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, मुख्य सुरक्षारक्षक बाळू नेटके, अग्निशमन अधिकारी भास्कर मिरपगार, मध्यवर्ती ठाण्याचे पोलिस, आपात्कालीन विभाग आणि पुण्याहून आयुक्त अच्युत हांगे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

ही इमारत तत्काळ खाली करून सील करण्यात आली आहे. अतिधोकादायक यादीत ही इमारत नसली तरी स्लॅब का आणि कसा कोसळला. अंतर्गत बांधकाम सुरू होते काय? यासोबत या इमारतीच्या बांधकाम व्यवसायिकाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती संतोष देहरकर यांनी दिली.

सहा वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती

सहा वर्षांपूर्वी माजी आमदार कुमार आयलानी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या काही अंतरावर असलेल्या शिशमहल या इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्यावर व चौथ्याचा तिसऱ्या मजल्यावर स्लॅब कोसळून सुमारे 9 जण ठार झाले होते. आज या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. मागच्या वर्षी उल्हासनगर स्थानकाजवळील लक्ष्मीनारायण या इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावरील ट्यूशन क्लासवर पडला होता. त्यात काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते. या दोन्ही इमारती पालिकेने पाडल्या आहेत.

स्ट्रक्चर ऑडिट इमारत धारक करतच नाहीत

उल्हासनगरात 1986 ते 1994 दरम्यान उभारण्यात आलेल्या 217 धोकादायक व 30 अतिधोकादायक इमारती आहेत. विशेष म्हणजे या इमारतींचे स्लॅबच कोसळत आहेत. त्याअनुषंगाने इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येते. मात्र, इमारतधारक साधे पंधरा वीस हजार रुपये खर्च करत नसल्यानेच अशा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडतात. जीव गमवावे लागतात, अशी खंत आयुक्त अच्युत हांगे, उपायुक्त मुख्यालय संतोष देहरकर यांनी व्यक्त केली. आता तरी स्वतःहून स्ट्रक्चर ऑडिटसाठी पुढे या असे आवाहन देखील त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com