उल्हासनगरात स्लॅब कोसळला

दिनेश गोगी
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

उल्हासनगरातील कॅम्प 1 मध्ये मंगळवारी रात्रीच्या "सचदेव' या तीन मजली इमारतीचा तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेमध्ये कोसळला. या सदनिकेत कोणीही नसल्याने अनर्थ टळला.

उल्हासनगर : उल्हासनगरातील कॅम्प 1 मध्ये मंगळवारी रात्रीच्या "सचदेव' या तीन मजली इमारतीचा तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेमध्ये कोसळला. या सदनिकेत कोणीही नसल्याने अनर्थ टळला. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव, अग्निशमन अधिकारी भास्कर मिरपगार यांनी रात्रीच या इमारतीमधील 12 कुटुंबीयांना बाहेर काढून इमारतीला सील केले आहे. मात्र, या घटनेच्या निमित्ताने उल्हासनगरातील इमारतींना साडेसातीचा विळखा लागल्याची चर्चा शहरात होत आहे. 

गेल्या महिनाभरापासून उल्हासनगरात इमारतींच्या स्लॅब कोळळण्याच्या पाच घटना घडल्या. या इमारती खाली करण्यात आल्या असून, एक इमारत कोसळल्याने या इमारतीव्यतिरिक्त हादरा बसलेल्या चार इमारतींनाही खाली करण्यात आले आहे. त्यामुळे शेकडो कुटुंब बेघर झाले आहेत. 28 जुलै रोजी "अंबिका सागर' या इमारतीचा पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर कोसळून चार वर्षीय नीरज सातपुते ठार झाला होता; तर पंचशिला ही महिला जखमी झाली होती. ही इमारत पालिकेने खाली केली. त्यानंतर हेमराज डेअरीजवळील ओम शिवलीला, लालचक्की भागातील ओम शिवगंगा या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने त्या खाली करण्यात आल्या. 

गेल्या आठवड्यात मंगळवारी (ता. 13) महक अ ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. तत्पूर्वीच इमारतीतील सर्वांना बाहेर काढण्यात आल्याने 31 कुटुंबीयांची जीवितहानी टळली. महक इमारत कोसळल्याने शेजारील रतन पॅलेस, धरम पॅलेस, मंगलम अपार्टमेंट या इमारतींच्या जमिनीला हादरा बसला. सुरक्षेचा उपाय म्हणून या तिन्ही इमारती खाली करण्यात आल्या आहेत. 

"रजिस्ट्रेशन केले नसल्याने फ्लॅटधारक स्वतःच जबाबदार' 
मुळात सदनिका आणि सोसायटी नोंदणीची मोहीम पालिकेने हाती घ्यावी, अशी मागणी उल्हासनगरातील वास्तुविशारद अतुल देशमुख यांनी पाच वर्षांपूर्वी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली होती. पालिकेने आणि सदनिकाधारकांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. सदनिकांमधील फर्निचर, डेकोरेशनवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या नागरिकांनी तोच पैसा नोंदणीसाठी खर्च केला असता तर त्यांची इमारत अधिकृत म्हणून गणली गेली असती. त्यामुळे मोबदला मागता आला असता, अशी प्रतिक्रिया वास्तुविशारद अतुल देशमुख यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slab collapsed in Ulhasnagar