झोपडपट्ट्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण

झोपडपट्ट्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण

मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) मुंबईपाठोपाठ ठाण्यातील झोपडपट्ट्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ठाण्यातील सुमारे दीड लाख झोपड्यांपैकी आतापर्यंत ५००० कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ‘महाऑनलाईन’ या राज्य सरकारच्या संस्थेला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे.

मुंबईतील झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण २०१६ मध्ये सुरू करण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर गेल्या वर्षी जानेवारीत ‘महाऑनलाईन’ला ठाण्यातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम देण्यात आले. त्यानंतर ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात झोपडीधारकांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे बायोमेट्रिक सर्वेक्षणात अडचणी आल्या होत्या. जनजागृती केल्यानंतर रहिवाशांनी बायोमेट्रिक सर्वेक्षणाला प्रतिसाद देणे सुरू केल्याचे एसआरएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत ५००० कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, कुटुंबातील प्रत्येक सदस्याची नोंद केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

ठाण्यात सर्वाधिक झोपड्या मुंब्रा, चेंदणी, पाचपखाडी, माजिवडा, पारसिक, नौपाडा या भागांत आहे. त्यामुळे सोईसाठी ठाणे जिल्ह्याचे तीन टप्प्यांत सर्वेक्षण होणार आहे. ठाणे-१ मध्ये सुमारे एक लाख झोपड्यांचे सर्वेक्षण होईल. ठाणे-२ आणि ठाणे-३ या टप्प्यांत प्रत्येकी ४० हजार झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा एसआरएचा विचार आहे. 

मुंबईप्रमाणेच ठाणे शहर, पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांत सर्वेक्षण होणार आहे. आता मुंब्रा परिसराचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत कुलाबा येथे ४७७ सर्वाधिक झोपडपट्ट्यांची संकुले (स्लम क्‍लस्टर्स) असून, बोरिवली-२ मध्ये २८८, भांडुपमध्ये २००, वांद्य्रात १९९ आणि अंधेरी-२ मध्ये १९२ अशी संख्या आहे.

मुंबईतील सर्वेक्षण अंतिम टप्प्यात 
मुंबईतील सुमारे नऊ लाख झोपड्यांमधील पहिल्या टप्प्यातील अडीच लाख कुटुंबांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण ऑक्‍टोबर २०१८ पर्यंत पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या सर्वेक्षणानंतर २००० पूर्वीचे निवासी दाखले असलेल्या कुटुंबांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा लाभ मिळेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com