‘बायोटॉयलेट’च्या दुर्गंधीने कोंडमारा

File Photo
File Photo

ठाणे : कल्याण-कसारा मार्गावरून उत्तर भारतात जाणारी एखादी एक्‍स्प्रेस गेली रे गेली, की तेथील रेल्वे स्थानकांवर उभ्या असलेल्याच नव्हे, तर रुळांच्या बाजूला असलेल्या इमारतींमधील नागरिकांचेही आपसूकच नाकावर हात जातात. प्रचंड दुर्गंधीने अनेकांना मळमळल्यासारखे होते. काहींना तर उलट्याही होतात. याला कारणीभूत आहे रेल्वेच्या जैवशौचालयांतून (बायोटॉयलेट) सुटणारा दुर्गंधीचा असह्य भपकारा.

या मार्गावरील हजारो प्रवाशांना, नागरिकांना ही नरकदुर्गंधी रोजच सहन करावी लागत असून, यातून नागरिकांना श्वसन आणि पोटासंबंधीच्या व्याधी जडण्याची शक्‍यता डॉक्‍टर व्यक्त करीत आहेत. असे सर्व असून आणि त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या नाकापर्यंत मात्र हा वास गेलेलाच नाही.

कल्याणनंतरच्या शहाड, आंबिवली, टिटवाळा आदी स्थानकांना तसेच स्थानकांलगतच्या इमारतींना एक्‍स्प्रेसमधील बायोटॉयलेटच्या दुर्गंधीचा नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या ओंकार जगे या प्रवाशाने सांगितले, की त्यांच्या रोजच्या प्रवासात तीन-चार एक्‍स्प्रेस सुसाट वेगात बाजूने जातात. त्यातून प्रचंड दुर्गंधी येते.

दिवसाची सुरुवातच या अशा घाण वासाने होते. त्याचा भपका इतका तीव्र असतो, की पोटात मळमळल्यासारखे वाटते. एक्‍स्प्रेस वेगाने गेल्यानंतर दोन ते तीन किलोमीटर हा दुर्गंध रेंगाळत राहतो.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वेने सुमारे ४५ हजार रेल्वेडब्यांमध्ये १.६ लाखांहून अधिक बायोटॉयलेट बसवली आहेत. त्यामुळे स्थानक परिसर, तसेच रेल्वे रुळांवरील घाण टळली; मात्र या बायोटॉयलेटमधील त्रुटींमुळे रेल्वेतील आणि स्थानकांवरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

भारतीय नियंत्रक आणि महालेखापालांच्या (कॅग) डिसेंबर २०१७ मध्ये सादर करण्यात आलेल्या अहवालातही बायोटॉयलेटचे तुंबणे, दुर्गंधी आदी समस्यांची दखल घेण्यात आली होती.

‘रेल्वे कन्व्हेन्शन कमिटी’ (आरसीसी) या संसदीय समितीनेही बायोटॉयलेटस्‌साठी वापरण्यात येणाऱ्या जिवाणूंच्या व्यवस्थापनाविषयी काही आक्षेप नोंदवले होते. स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना मात्र त्याचा पत्ताच नसल्याचे आढळून आले आहे. या बायोटॉयलेटमुळे अशी कोणतीही दुर्गंधी निर्माणच होत नाही, असे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे.

नेमके होते काय?
एक्‍स्प्रेसच्या शौचालयाखाली बायोटॉयलेटची पेटी असते. त्यात विशिष्ट प्रकारचे बॅक्‍टेरिया असतात. ते मानवी मलावर प्रक्रिया करून त्याचे विघटन करतात. त्यातून निर्माण होणारे पाणी बाहेर पडण्याआधी त्यावर क्‍लोरीनचा मारा केला जातो. कल्याण शहराची हद्द सोडली की एक्‍स्प्रेसच्या बायोटॉयलेटमधील क्‍लोरिनेशन केलेले पाणी सोडले जाते असे सांगण्यात येते. त्यातून सुटणाऱ्या दुर्गंधीने प्रवासी हैराण आहेत. याचा अधिक त्रास कडक उन्हात आणि पावसाळ्यात होतो.

रेल्वेचे नाक मुरडलेलेच!
एक्‍स्प्रेसमधून निघणाऱ्या दुर्गंधीबाबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांना विचारले असता, त्या त्या परिसरानुसार दुर्गंधीची विविध कारणे असू शकतात. एक्‍स्प्रेसमधून बाहेर अशी दुर्गंधी येतच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यावर उपाययोजना काय करणार, असा उलट प्रश्‍नही त्यांनी केला.

एक्‍स्प्रेसमध्ये बायोटॉयलेट बसवून रेल्वेने चांगले काम केले, परंतु तीव्र दुर्गंधीमुळे हीच बायोटॉयलेट प्रवाशांच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहेत. प्रवाशांबरोबरच रेल्वेलगत असलेल्या परिसरातील नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. संघटनेच्या वतीने याबाबत रेल्वे प्रशासनाकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
- शैलेश राऊत,
कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटना

रेल्वे प्रवाशांनी प्रवासादरम्यान मास्कचा वापर करणे फायदेशीर ठरेल. सर्दी, खोकला, पोटात मळमळ, उलटी, घसा दुखणे, डोकेदुखी असे विकार यातून होऊ शकतात. नोरोव्हायरस, इन्फ्लुएन्झा यांसारख्या विषाणूंमुळे गंभीर आजार होऊ शकतात. हे आजार लहान बालकांना लगेच जडण्याची शक्‍यता असते.
- डॉ. रोहन पाटील,
बालरोग तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com