दोघा भावांना विवस्त्र व शारीरिक छळ करून अंगावर सोडला साप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

दोघा भावांना तलावातील मासे चोरल्याचा आरोप करत झाडाला बांधून शारीरिक छळ करत अंगावर साप सोडल्याची घटना तब्बल सहा महिन्यांनी समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच भोईवाडा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन पोलिस कोठडीत डांबले आहे. 

भिवंडी - दोघा भावांना तलावातील मासे चोरल्याचा आरोप करत झाडाला बांधून शारीरिक छळ करत अंगावर साप सोडल्याची घटना तब्बल सहा महिन्यांनी समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच भोईवाडा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन पोलिस कोठडीत डांबले आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, की फिर्यादी (नाव गुप्त ठेवण्यात आले आहे) व त्याचा भाऊ शहरातील टावरे स्टेडियम येथील जलतरण तलावात 18 एप्रिल 2019 रोजी पोहण्यासाठी गेले होते. पोहून झाल्यानंतर दिवानशाह दर्गा रोड येथून घरी जात असताना या परिसरात राहणारा अस्लम हसन रजा अन्सारी (23) याने या दोघांना जबरदस्तीने झाडाला बांधले. त्यानंतर नाजीम फारुकी (32) याने तलावात मासे पकडण्यास मनाई आहे असे तुम्हाला वारंवार सांगितले आहे, तरी तुम्ही मासे पकडता असा खोटा आरोप केला.

या वेळी या ठिकाणी हाफिज मुसाफ अन्सारी (16) व आलीम (24) हेदेखील उपस्थित होते. या वेळी अस्लम, नाजीम, हाफिज व आलीम या चौघांनी फिर्यादी व फिर्यादीच्या भावाच्या अंगावरील कपडे काढून भावाच्या गुप्तांगाची छेडछाड केली. त्यानंतर एका प्लास्टिकच्या बाटलीत साप आणून हा साप अंगावर सोडून या प्रकाराचे मोबाईलवर छायाचित्रण केले आणि 29 ऑक्‍टोबर रोजी समाजमाध्यमात प्रसारित केले. त्यानंतर दोघा भावांनी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रसंग सांगितला.

पोलिसांनी घटनेची दखल घेऊन चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता तिघांना पोलिस कोठडी व एकाची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास भोईवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक टी. जी. जोशी करीत आहेत. 

त्यानंतर दोघा भावांनी गाठले पोलिस ठाणे... 
झालेला प्रसंग समाजमाध्यमांत प्रसारित झाल्यामुळे मानसिक ताण वाढल्याने या दोन्ही भावांनी थेट भोईवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत आपल्यावर सहा महिन्यांपूर्वी गुदरलेला प्रसंग पोलिसांना कथन केला. त्यामुळे भोईवाडा पोलिसांनी या अमानुष घटनेप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करून या चारही जणांना अटक केली आहे. यातील अस्लम, नाजीम, आलीम या तिघांना बुधवारी सायंकाळी न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे; तर हाफिज याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake released by twin brothers dressed in physical and physical torture