काही काय? आहो खरंच! ठाण्यात लवकरच होणार 'हिमवर्षाव'...

राजेश मोरे
Tuesday, 11 February 2020

भरउन्हाळ्यातही आजूबाजूला हिमाच्छादित जमीन आहे आणि तुरळक हिमतुषार अंगावर येत आहेत... एका कोपऱ्यात संगीताच्या तालावर आबालवृद्ध "स्नो डान्सिंग'चा आनंद लुटत आहेत... तर कुठे बर्फावरील स्केटिंग सुरू आहे... असे चित्र आपण सहसा परदेशातील "स्नो वर्ल्ड'मध्ये पाहतो, पण हेच चित्र आता प्रत्यक्षात ठाणे शहरात साकारण्याचा मार्ग खुला झाला आहे. ठाणे महापालिकेकडून पर्यटन योजनेंतर्गत या "स्नो वर्ल्ड'ची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

ठाणे : भरउन्हाळ्यातही आजूबाजूला हिमाच्छादित जमीन आहे आणि तुरळक हिमतुषार अंगावर येत आहेत... एका कोपऱ्यात संगीताच्या तालावर आबालवृद्ध "स्नो डान्सिंग'चा आनंद लुटत आहेत... तर कुठे बर्फावरील स्केटिंग सुरू आहे... असे चित्र आपण सहसा परदेशातील "स्नो वर्ल्ड'मध्ये पाहतो, पण हेच चित्र आता प्रत्यक्षात ठाणे शहरात साकारण्याचा मार्ग खुला झाला आहे. ठाणे महापालिकेकडून पर्यटन योजनेंतर्गत या "स्नो वर्ल्ड'ची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

एकेकाळी ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील एमआयडीसीमुळे "औद्योगिक नगरी' अशी ओळख घेऊन ठाणे शहर मिरवत होते, परंतु कालांतराने येथील उद्योगधंदे शहराबाहेर गेल्यानंतर गेल्या 20 वर्षांत शहराची ओळख ही केवळ निवासी शहर म्हणून झाली आहे. त्यामध्ये बदल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात किमान पर्यटन सुरू व्हावे, यासाठी काही योजना जाहीर केल्या होत्या. त्यापैकीच "स्नो वर्ल्ड'ही एक योजना होती. पालिकेने निविदा प्रसिद्ध केल्याने या योजनेला अखेर मुहूर्त सापडला आहे. 

हेही वाचा - रस्ते दुरुस्तीमुळे भिवंडीत कोंडी

ठाणे शहरात रस्तारुंदीकरणाची मोहीम राबवून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहराचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याचबरोबर शहरात किमान सेवा क्षेत्रातून रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यातही "तलावांचे शहर' म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरात पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विविध प्रकल्पांची घोषणा केली आहे.

त्यापैकीच एक असलेल्या "स्नो वर्ल्ड'ची गेली काही वर्षे केवळ चर्चाच सुरू होती, पण आता पालिकेकडून "पीपीपी' तत्त्वावर कोणी या प्रकल्पासाठी इच्छुक असल्यास त्यांच्याकडून निविदा मागवण्यात येत आहे. हा प्रकल्प सरकारी पद्धतीने चालवणे शक्‍य नसल्याने त्यामध्ये खासगी सहभाग कायम ठेवला जाणार आहे. त्यामुळे निविदेच्या माध्यमातून "स्नो वर्ल्ड'चा यापूर्वीचा अनुभव असलेल्या संस्थांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

हेही वाचा - पांढऱ्या पँटवरून पोलिसांनी असं पकडलं पाकिस्तानी तस्कराला

कोलशेत येथे पार्कसाठी आरक्षित असलेल्या तब्बल 20 हजार चौरस मीटर जागेवर हा स्नो वर्ल्ड प्रकल्प उभारला जाणार आहे. या कामासाठी सुमारे 60 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पालिकेच्या तिजोरीवर कोणताही भार न टाकता खासगी संस्थांच्या माध्यमातून हे काम करून घेतले जाण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आलेला आहे. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेने दोन वर्षांपूर्वी मंजूर केला आहे. 

पालिकेची केवळ जमीन 
महापालिकेतील काही अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे "थीम पार्क' अथवा "बॉलीवूड पार्क'सारखे प्रकल्प वादात अडकले आहेत, पण त्याच वेळी "चिल्ड्रन ऍण्ड ट्रॅफिक पार्क'सारखे काही प्रकल्प यशस्वी झाले आहेत. तसेच खाडीकिनारी चौपाटीची संकल्पनाही आता अस्तित्वात येऊ लागली आहे. अशा वेळी "स्नो वर्ल्ड'चा प्रकल्प पूर्णत्वाला गेल्यास शहरात एकाच वेळी अनेक विरंगुळ्याची साधने नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे या कामासाठी महापालिका काहीही खर्च करणार नसून केवळ जमीन उपलब्ध करून देणार आहे. 

काय आहे स्नो वर्ल्डमध्ये? 

  •  "स्नो वर्ल्ड'मध्ये बर्फाशी संबंधित सर्व प्रकारच्या मनोरंजक सुविधा आणि खेळ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कृत्रिम बर्फवृष्टीच्या माध्यमातून इथे बर्फ पडण्याचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच या पार्कमध्ये कृत्रिम स्लिक, पोलल बिअर्स, पेंग्विन आणि अल्पाइनेनची झाडेसुद्धा असतील. 
  • स्नो प्ले एरियामध्ये स्लाईड्‌स, स्नो मेरी गो राऊंड, माऊंटन क्‍लायंबिंग, आईस स्क्‍लप्चर, स्नो डान्सिंग फ्लोअर यांचा समावेश असेल. त्याशिवाय या ठिकाणी फ्रोजन वर्ल्ड-पोलर रिजन्स या इको सिस्टीमची पर्यावरणीय परिस्थिती आणि राहणीमान पद्धतीचा मनोरंजनाच्या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी सायन्स-एज्युकेशन झोनही तयार करण्याचा मानस महापालिका प्रशासनाचा आहे.

snow dancing center will be soon opened in thane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: snow dancing center will be soon opened in thane