रस्तेदुरुस्तीमुळे भिवंडीत कोंडी 

File Photo
File Photo

भिवंडी : भिवंडी शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण, भुयारी गटार योजनेंतर्गत रस्ते खोदकाम सध्या विविध ठिकाणी सुरू आहे. विशेष म्हणजे शहर विकासाच्या नावाने सध्या ही कामे जोमाने सुरू असली तरी कामांचे नियोजन होत नसल्याने शहरात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषकरून जुना मुंबई-आग्रा रोड व कल्याण-भिवंडी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांसह पोलिसही हैराण झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी अनेक ठिकाणी मुख्य मार्गात बदल केले आहेत. मात्र रिक्षाचालक व अन्य वाहनचालक रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे पार्किंग करीत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ही कोंडी सोडवताना पोलिसांचीही दमछाक होत आहे.

शहरातील भिवंडीत-कल्याण रोड-स्व. राजीव गांधी चौक; तसेच पोलिस उपायुक्त कार्यालय, तहसीलदार कार्यालय ते उपविभागीय अधिकारी कार्यालय, जुना मुंबई-आग्रा रोड आदी मार्गांवर एमएमआरडीएच्या वतीने रस्ते सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्यावर खोदकाम केल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. त्यातच कल्याण नाका येथे उड्डाणपुलाचे काम संथगतीने होत असल्याने या वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करून अशोकनगर येथून पर्यायी मार्ग वाहनचालकांसाठी सुरू केला आहे. मात्र त्या मार्गावरसुद्धा रस्तेदुरुस्ती काम सुरू असल्याने तेथेसुद्धा वाहतूक ठप्प होत आहे. दुहेरी मार्गावर दिशादर्शनासाठी फलक योग्य पद्धतीने लावणे आवश्‍यक आहे. असे असताना लोखंडी पत्रे लावून ही काम सुरू आहेत. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिस बळ पुरेसे नसल्याने दररोज सकाळी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. 

भिवंडी-कल्याण व मुंबई-आग्रा मार्गावर सर्वच रस्त्याची कामे एकहाती सुरू केल्याने वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह अग्निशमन दल, पोलिस व रुग्णवाहिका, एसटी बसेसना बसत आहे. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या वंजारपाटी नाका, भिवंडी एसटी स्टॅण्ड ते कल्याण नाका या काही मिनिटांच्या अंतरासाठी वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना तब्बल अर्धा-पाऊण तास लागत आहे. या मार्गावर प्रामुख्याने भिवंडी पालिका कार्यालय, पोलिस उपायुक्त कार्यालय, स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय, भिवंडी न्यायालय, प्रांत अधिकारी कार्यालय असून दररोज शेकडो नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. 

एमएमआरडीए व महानगरपालिका प्रशासनाने रस्तादुरुस्तीचे काम करताना तेथे सुरक्षा रक्षक तैनात करणे आवश्‍यक आहे. पोलिस बळ कमी पडत असल्यामुळे वाहतूक कोंडी सोडविताना त्रास होत आहे. याबाबत एमएमआरडीए व महापालिका प्रशासनाला लेखी पत्र देण्यात येईल. 
- विजय दरेकर, 
वाहतूक पोलिस निरीक्षक, भिवंडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com