...म्हणून आम्ही शिवसेनेला डावलले नाही : सरोज पांडे

...म्हणून आम्ही शिवसेनेला डावलले नाही : सरोज पांडे

विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपकडून ‘कलम ३७०’चा महाराष्ट्राच्या निवडणुकीतील वापर, आयारामांना उमेदवारी देताना निष्ठावंतांवर झालेला अन्याय, महायुती झाल्याने वाढलेली बंडखोरी, याबाबत भाजपच्या महाराष्ट्र राज्य प्रभारी खासदार सरोज पांडे यांच्याशी ‘सकाळ’चे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी साधलेला संवाद...

प्रश्न ः विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपला कसा प्रतिसाद मिळतोय?
पांडे ः ज्या प्रकारे भाजपला लोकांचं समर्थन मिळतंय, ते पाहता या वेळी भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, असा मला विश्वास वाटतोय. मित्रपक्ष आमच्यासोबत आहेतच. शिवाय लोकांचाही कल भाजपकडे अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाने लोक प्रभावित झाले आहेत. त्यामुळे या वेळी भाजपचेच सरकार आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार यात तिळमात्र शंका नाही. 

प्रश्न ः भाजपने पाच वर्षांत कोणती कामं केली, ज्यामुळे लोक तुम्हाला मतं देतील?
- गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने प्रशंसनीय कामं केली आहेत. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारखा धाडसी निर्णय घेऊन, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी आम्ही थेट शेतकऱ्यांनाच्या खात्यावर पैसे जमा केले. काँग्रेस सरकारने कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केली. तसेच जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सरकारने पावली उचलली. भविष्यात प्रत्येक घरात २४ तास पाणी मिळण्यासाठी घराघरात नळ योजना देण्याचे काम आम्ही सुरू केलंय. राज्यातील समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी तसा कमीच आहे; मात्र मुख्यमंत्र्यांनी भविष्याचा विचार करून या योजना राबविल्या असून पुढील पाच वर्षात त्या पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न नवे सरकार करील.

प्रश्न ः ‘कलम ३७०’चा महाराष्ट्रातील निवडणुकांशी काहीही संबंध नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. त्याबाबत काय सांगाल?
- राष्ट्रवाद हा आमचा निवडणुकीतला प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळेच आम्ही जम्मू-काश्‍मीरमधून ‘कलम ३७०’ हटवण्याचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांना होणारी गर्दी पाहता देशातील प्रत्येक नागरिक राष्ट्रवादाशी जोडला असल्याचे दिसते. ‘तिहेरी तलाक’चा निर्णय घेऊन भाजप सरकारने मुस्लिम महिलांना मोठा दिलासा दिला. त्यांची पारंपरिक गुलामगिरीतून सुटका केली. आजपर्यंत याबाबत केवळ मतांचं राजकारण करण्यात आलं. उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातील महिलाही भाजपच्या मागे उभ्या राहतील.

प्रश्न ः इतर पक्षातील आयारामांना आपण उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचे वाटत नाही?
- भाजपच्या विचारधारेचा ज्यांनी स्वीकार केला आहे, ज्यांचे कर्तृत्व चांगले आहे, त्यांनाच आम्ही भाजपमध्ये संधी दिली आहे. मात्र, यामुळे आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याचीसुद्धा काळजी आम्ही घेतली आहे. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आम्ही त्यांना चांगली जबाबदारी देणार आहोत.

प्रश्न ः भाजपला जनाधार मिळत असतानाही शिवसेनेसोबत युती का करावी लागली?
- नरेंद्र मोदी यांची केवळ लाट नाही, तर सुनामी आहे. तरीसुद्धा मित्रपक्ष म्हणून आम्ही शिवसेनेला डावलले नाही. आम्ही मोठ्या भावाची भूमिका निभावली आहे. गरज नसताना आम्ही शिवसेनेला सोबत घेतले. त्यांनी आमच्यावर टीका केली तरीसुद्धा आम्ही त्यांना माफ केले, कारण आमचे राजकारण सकारात्मक आहे.

प्रश्न ः भाजपला बंडखोरी रोखण्यात अपयश 
का आलं?
- बंडखोरी ही जाणूनबुजून होत नाही. कार्यकर्त्यांच्या नाराजीतून ही बंडखोरी झाली असून ती स्वाभाविक आहे. युती झाल्यामुळे काही कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट नाही देऊ शकलो आणि त्यातूनच ही बंडखोरी झाली आहे. आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र ते ऐकायला तयार नाहीत. यातील अनेक बंडखोरांची आम्ही पक्षातून हकालपट्टी केली. मात्र काही ठिकाणी बंडखोरी असली तरी याचा परिणार भाजपवर होणार नाही.

प्रश्न ः भाजपचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात शिवसेनेकडून बंडखोरी झाली आहे. ही बंडखोरी शिवसेना पुरस्कृत आहे का?
- शिवसेनेने काही बंडखोरांवर कारवाई केली आहे. इतरांवरही ते कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, ही बंडखोरी शिवसेना पुरस्कृत आहे, असे वाटत नाही. त्याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही.

प्रश्न ः पुढील मुख्यमंत्री म्हणून भाजपने देवेंद्र फडणवीस यांनाच का समोर आणले आहे?
- भाजपमध्ये अनेक कर्तृत्ववान नेते आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. दरम्यान, त्यांनी अनेक यशस्वी योजना राबवल्या असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून ‘प्रमोट’ केले आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होईल, याबाबतचा निर्णय भाजपची संसदीय समिती घेईल.

प्रश्न ः मंदीच्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. मंदीवर नियंत्रण आणण्यात सरकार अपयशी ठरलंय का?
- संपूर्ण जगात मंदी असून त्याचा परिणाम केवळ भारतातच आहे असे नाही. तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मंदी आली, असेही म्हणणे योग्य नाही. सरकार मंदीचा योग्य पद्धतीने सामना करत आहे. 

प्रश्न ः भाजपला प्रत्येक निवडणुकीत चांगले यश मिळत आहे, त्याचे रहस्य काय?
- खूप वर्षांनंतर देशाला एक कर्तृत्ववान पंतप्रधान मिळाला आहे. आमच्या सरकारमध्ये घराणेशाही नाही, जातीपातीचे राजकारण नाही. राजकारणाची परिभाषा आम्ही बदलली आहे. जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यावर आम्ही भर दिला आहे. यामुळेच जनता आमच्या बाजूने उभी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com