समाजमाध्यमे झाली प्रचाराचा आखाडा 

संग्रहित
संग्रहित

ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून प्रचारासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता समाजमाध्यमांतून मतदारराजावर गारूड घालण्यास सुरुवात केली आहे. यात ठाण्यातील चारही विद्यमान आमदारांनी आपल्या पाच वर्षांत केलेल्या कामांच्या आणि मेट्रो, क्‍लस्टरसारख्या सर्वव्यापी विषयांवर आधारित चित्रफीत व्हायरल केली आहे; तर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मतदारसंघातील समस्यांवर आधारित चित्रफितीद्वारे मतदारांवर प्रभाव पाडला आहे. काही उमेदवारांनी प्रचारगीते प्रसारित केल्याने नागरिकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवसापर्यंत फलकबाजीला आळा बसून आता समाजमाध्यम हाच प्रचाराचा आखाडा बनल्याचे दिसत आहे. 

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 213 उमेदवार उभे असून यापैकी शहरी परिसरातील ठाणे शहर, कळवा-मुंब्रा, ओवळा-माजिवडा आणि कोपरी-पाचपाखाडी या चार मतदारसंघात शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्याविरोधात कुठल्याही पक्षाचे विशेष आव्हान नसल्याने प्रचारातही या विद्यमान लढवय्यांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. यंदा उमेदवारांनी फलकबाजीकडे पाठ फिरवून रॅली, भेटीगाठी आणि प्रचारसभांवर भर दिल्यानंतर आता या उमेदवारांनी "वॉररूम' बनवून समाजमाध्यमांवर प्रचाराचा भर दिला आहे. 

शिवसेनेची "वेगळे' इस्टेटची मालवणी चित्रफीत 
समाजमाध्यमातून सर्वच उमेदवार प्रचार करीत आहेत. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघात चित्रित केलेल्या अस्सल मालवणी बोलीभाषेतील वागळे इस्टेटमधील क्‍लस्टर योजनेला अधोरेखित करणारी "वेगळे' इस्टेट ही चित्रफीत विशेष गाजत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता कुशल बद्रिके यांनी या चित्रफितीमध्ये काम केले असून अशक्‍य ते शक्‍य करणार, असा दावा करण्यात आला आहे. यात मालवणी बोलीभाषेत संवाद असल्याने ठाण्यातील सर्वच मतदारसंघातील कोकणी मतदारांना शिवसेनेने भावनिक साद घालत हक्काच्या घरकुलाचे स्वप्न यानिमित्ताने दाखवले आहे. 

‘आपला माणूस, हक्काचा माणूस’
ठाणे शहरातील भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनी आपल्या कामांची चित्रफीत प्रसारित केली असून त्याद्वारे "आपला माणूस ...हक्काचा माणूस', असा संदेश दिला आहे. मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी ठाणे शहरातील; तसेच घोडबंदर रोडवरील मोक्‍याच्या जागी भले मोठे फलक लावून मतदारराजाच्या मनात घर केले असून समाजमाध्यमातूनही वेगवेगळ्या चित्रफिती प्रसारित करून प्रचारात आघाडी घेतली आहे. 

‘एक हात, एक नाथ’
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी समूह विकास प्रकल्प (क्‍लस्टर), मेट्रो प्रकल्प, सॅटीस पूर्व प्रकल्प आणि जलवाहतूक यांसारख्या कामांच्या पथनाट्य चित्रफिती प्रसारित केल्या आहेत. तसेच उज्ज्वल भविष्यासाठी "एक हात, एक नाथ', असे गाणे त्यांच्यावर तयार करण्यात आले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे उमेदवार संजय घाडीगावकर यांनी क्‍लस्टर, वाहतूक कोंडी अशा मुद्द्यांसह शिवसेनेची मंडळी कशी फसवणूक करीत आहेत, याच्या चित्रफिती तयार करून मतदारांना विचार करावयास लावत आहेत. 

उमेदवार क्र. १ मताधिक्य क्र. १
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्या दिवसापासून प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदारसंघात केलेल्या विकासकामांसह राष्ट्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर हजरजबाबीपणे उत्तरे देत प्रसारमाध्यमांमध्ये अग्रभागी राहिले आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दस्तुरखुद्द शरद पवार अडीच तास उन्हात रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आव्हाड यांनीदेखील समाजमाध्यमांवर आघाडी घेतली आहे. याउलट त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार अभिनेत्री दीपाली सय्यद या मतदारसंघात नवख्या असल्याने त्यांचे आव्हान दुबळे ठरल्याचे दिसून येत आहे. 

‘विकासाची भेट प्रतापाशी’ 
ओवळा-माजिवाडा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक हे पुन्हा रिंगणात उतरले असून त्यांच्यासमोर मनसेचे युवा उमेदवार संदीप पाचंगे आणि कॉंग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. तरीही सरनाईक यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांची चित्रफीत समाजमाध्यमात दिसत असून "विकासाची भेट जेव्हा झाली प्रतापाशी' हे गाणेही प्रसारित झाले आहे. "लोकांच्या गळ्यातील ताईत... सरनाईक' अशा गीतांनी सेनेच्या प्रचाराची धून जोरात वाजत आहे. सरनाईक यांच्या या प्रवासपूर्णत्वाचा प्रतिस्पर्धी मनसेचे उमेदवार पाचंगे यांनी टीकास्त्र सोडून निम्याहून अधिक प्रकल्प कसे अपूर्ण आहेत, हे चव्हाट्यावर आणले आहे. तर दुसरे विरोधक कॉंग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनीही येथील समस्यांच्या चित्रफितींनी धूम उडवली आहे. याशिवाय आतापर्यंत केलेल्या प्रचाराचे अपडेट फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्‌सऍपद्वारे प्रसारित करण्यावर उमेदवारांनी विशेष भर दिला आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com