esakal | कोरोना चाचणी शिवाय 'नो एन्ट्री'; गावी अडकलेल्या रहिवाशांसाठी सोसायटयांनी काढला फतवा..  
sakal

बोलून बातमी शोधा

no entry

आपली लढाई रोगाशी आहे...रोग्याशी नाही'.. असे सरकार  वारंवार सांगत असतांना देखील काही सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना याचा विसर पडल्याचे दिसते. लॉकडाऊन काळात गावी किंवा अन्य ठिकाणी अडकलेल्या रहिवाशांना कोरोना चाचणी केल्याशिवाय प्रवेश न देण्याचा फतवा सोसायट्यांनी काढला आहे.

कोरोना चाचणी शिवाय 'नो एन्ट्री'; गावी अडकलेल्या रहिवाशांसाठी सोसायटयांनी काढला फतवा..  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: आपली लढाई रोगाशी आहे...रोग्याशी नाही'.. असे सरकार  वारंवार सांगत असतांना देखील काही सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना याचा विसर पडल्याचे दिसते. लॉकडाऊन काळात गावी किंवा अन्य ठिकाणी अडकलेल्या रहिवाशांना कोरोना चाचणी केल्याशिवाय प्रवेश न देण्याचा फतवा सोसायट्यांनी काढला आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी अडकलेल्या रहिवाश्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर मुंबईसह उपनगरे ठाणे कल्याण आणि नवी मुंबईतून नागरिक ये जा करू शकतात असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्याच प्रमाणे अन्य ठिकाणांहून नागरिक ई-पास आणि सोबत वैद्यकीय प्रमाण पत्र घेऊन अन्य जिल्ह्यात प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

लॉकडाऊन काळात बाहेर अडकलेल्या रहिवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक नसताना देखील सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल सादर करण्याची सक्ती केली आहे. सरकार लॉकडाऊन शिथिल होत असतांना तसेच प्रवासासाठी कोरोना चाचणी सक्तीची नसतांना सरकारकडून घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात हा फतवा असल्याचे बोलले जात आहे. 

 हेही वाचा: कौतुकास्पद! एका ट्विटवर रुग्णाच्या मदतीला धावून आले आदित्य ठाकरे..

माझगाव, लालबाग, भायखळा परिसरातील काही सोसायट्यांनी हा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन मध्ये गावी अडकलेल्या काही कुटुंबियांना त्यामुळे कोरोनाची चाचणी कशी करावी आणि चाचणीसाठी इतके पैसे कुठून आणावेत असा प्रश्न पडला आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी आता डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन लागत नसले तरी त्याची लक्षणे असल्याचे एक हमीपत्र द्यावे लागणार आहे. 

एखाद्याला 5 दिवसांच्या आत लक्षणे जाणवली तर त्याला ही केवळ हमी पत्रावर आपली टेस्ट करून घेता येणार आहे. मात्र लक्षणे नसतील तर ही चाचणी कशी करावी असा प्रश्न लॉकडाऊन मध्ये गावी अडकलेल्या काही कुटुंबियांना सतावत आहे. तसेच घरात 4 ते 5 माणसे असतील तर 15 ते  20 हजार रुपये खर्च करावे लागणार असल्याने इतके पैसे आणायचे कुठून असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.

परिसरातील चाळींमध्ये कॉमन टॉयलेट ची देखील समस्या भेडसावू लागली आहे. या परिसरातील चाळीमधील घरांमध्ये शौचालय नाही. त्यामुळे बाहेर असलेल्या चाळीतील सार्वजनिक शौचालयात जावे लागते. होम क्वारंटाईन असलेल्या घरात शौचालय बांधून घेण्यास सांगण्यात येत आहेत. घरात शौचालय बांधून घेतल्यास आमचा कोणताही आक्षेप असणार नाही असे माझगाव मधील बीआयटी चाळ क्र. 8 मधील तरुण मित्र मंडळाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: खासदारांनी खडसावल्यानंतर अखेर दहिसरला कोरोना रुग्णालय झालं सुरू; २०१५ पासून होतं बंद...  

रुग्ण वाढत असल्याचे कारण:

माझगाव बीआयटी चाळींमध्ये कोरोना रुग्ण निघाले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लॉकडाऊन काळात अन्य ठिकाणी असलेल्या प्रत्येकाला कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल निगेटीव्ह आहे हे दाखवणे बंधनकारक असणार आहे. अशा नागरिकांना कोरोना चाचणीसाठी पैशाची मदत करणे शक्य नाही असे बीआयटी चाळ रहिवाशी संघाचे सेक्रेटरी नागेश जाधव यांनी सांगितले.

societies are giving entry to people who stranded in their village