महाधिवक्ता नियुक्तीचा दिवस येत्या 23 डिसेंबरला समजणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

मुंबई - राज्याच्या पूर्णवेळ महाधिवक्तापदावरील नियुक्ती नक्की कधी करणार, याची माहिती 23 डिसेंबरला देण्याचे स्पष्ट आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. सरकार या नियुक्तीबाबत चालढकल करत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

पूर्णवेळ महाधिवक्तापदावर नियुक्ती करणे राज्य सरकारसाठी घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे. सात महिन्यांपासून या पदावर नियुक्ती झालेली नाही. याबाबत कॉंग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्या. अभय ओक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकार डिसेंबर अखेरपर्यंत पूर्णवेळ महाधिवक्तापदावर नियुक्ती करील, अशी हमी प्रतिज्ञापत्राद्वारे मंगळवारी देण्यात आली होती. मात्र, खंडपीठाने याबाबत असमाधान व्यक्त केले. अशाप्रकारे माहिती देण्यापेक्षा सरकारने 23 डिसेंबरला महाधिवक्तापदाच्या नियुक्तीबाबत नक्की दिवस सांगावा, असे खंडपीठाने सुनावले. सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांविषयी अनेक सुनावण्या न्यायालयात प्रलंबित आहेत, याबाबत महाधिवक्‍त्यांचे मत महत्त्वाचे असते. अशा वेळी सरकारने ही नियुक्ती करावी, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. सध्या हंगामी महाधिवक्तापदाची जबाबदारी ऍड. रोहित देव सांभाळत आहेत.

Web Title: Solicitor General selection