राज्यात लवकरच कला विद्यापीठ; वाचा कोणतं आहे ते...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

आशिया खंडातील पहिले कला महाविद्यालय असलेले मुंबईतील जे. जे. स्कूल  ऑफ आर्ट लवकरच अभिमत कला विद्यापीठामध्ये (डीम्ड युनिव्हर्सिटी) रूपांतर होणार आहे. या दर्जासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) प्रस्ताव पाठवला आहे.

मुंबई : आशिया खंडातील पहिले कला महाविद्यालय असलेले मुंबईतील जे. जे. स्कूल  ऑफ आर्ट लवकरच अभिमत कला विद्यापीठामध्ये (डीम्ड युनिव्हर्सिटी) रूपांतर होणार आहे. या दर्जासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) प्रस्ताव पाठवला आहे. यूजीसीच्या मागणीनुसार जे. जे. स्कूल ऑफ आर्ट विशेष दर्जा मिळविण्यासाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रियाही लवकरच पूर्ण करणार आहे.

ही बातमी वाचली का? मोटरमनने ताबा घेताच, लोकल जाऊन धडकली!

कला क्षेत्रातील नामांकित संस्था असलेली जे. जे. स्कूल ऑफ आर्ट लवकरच कात टाकणार आहे. राज्य सरकारने संस्थेला स्वायत्ततेचा दर्जा बहाल केल्यानंतर आता संस्थेने आपल्या कक्षा रुंदावण्यास सुरुवात केली आहे. संस्थेच्या विकासासाठी गेल्या सरकारने अर्थसंकल्पात १५० कोटींची तरतूद केली आहे. सरकारकडून कलेला राजाश्रय मिळू लागल्याने संस्थेने अभिमत विद्यापीठ होण्यासाठी पाऊल पुढे टाकले आहे. यासाठी राज्य सरकारच्या मदतीने गेल्या वर्षी अखेरीस यूजीसीकडे जे. जे. कला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे, परंतु यूजीसीने देशातील नामांकित संस्थेला विशेष दर्जा देण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

ही बातमी वाचली का? एपीएमसीवर महाविकास आघाडीचा झेंडा

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट आणि जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर अशा तीन महाविद्यालयांचे मिळून अभिमत कला विद्यापीठ बनावे यासाठी कला संचालनालयाने कंबर कसली आहे. यूजीसीकडे संचालनालयाने सादर केलेला ऑफलाईन प्रस्ताव रखडला आहे. त्यातच ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज करण्याच्या सूचना यूजीसीने केली आहे; मात्र सुमारे सहा महिन्यांपासून यूजीसीचे ऑनलाईन अर्ज करण्याचे संकेतस्थळ खुले झाले नव्हते. परंतु दोन दिवसांपूर्वी संकेतस्थळ सुरू झाल्याच्या सूचना यूजीसीकडून मिळाल्याने संचालनालयाने ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रियाही तातडीने पूर्ण करण्याचे ठरवले आहे.

ही बातमी वाचली का? टोलेबाजी, सामना संपादकपदावरून रामदास आठवले म्हणतात..

जे. जे. स्कूल ऑफ आर्टला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी राज्य सरकारही आवश्‍यक ती मदत करत आहे. अभिमत विद्यापीठाला मान्यता मिळाल्यास राज्यभरात कला महाविद्यालयाचा विस्तार होण्यास मदत होईल.
- राजीव मिश्रा, संचालक, कला संचालनालय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soon Art University in the state j j school of arts mumbai