एपीएमसीवर महाविकास आघाडीचा झेंडा!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 March 2020

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शनिवारी (ता. २९) पार पडली. या मतदानाची मतमोजणी सोमवारी (ता. २) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्यात आली. यात महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.

नवी मुंबई : देशातील नाही तर आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजरा समितीच्या निवडणुका शनिवारी (ता. २९) पार पडल्या. या मतदानाची मतमोजणी सोमवारी (ता. २) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्यात आली. यात महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.

ही बातमी वाचली का? मुंबई असुरक्षित; समुद्राच्या पाणी पातळीत होणार इतकी वाढ

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी २९ फेब्रुवारी रोजी ९२.५७ टक्के मतदान झाले होते. या वेळी एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राज्यातील ३०५ बाजार समितीची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारी समितीच्या निवडणुकीसाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. सहा महसूल विभांगाकडून १२ शेतकरी प्रतिनिधी व चार व्यापारी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी हे मतदान घेण्यात आले होते.  

ही बातमी वाचली का? बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडीतेला फोनवरून धमक्या

या निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेकांप पॅनल तयार केले होते. तसेच काही उमेदवारांना भाजप नेत्यांकडूनदेखील पाठिंबा देण्यात आला होता. सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक प्रतिष्ठेची असल्यामुळे सहा कृषी क्षेत्रांतील अनेकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून कोकण महसूल विभागातून शेकापचे राजेंद्र पाटील विजयी झाले. पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब सोळस्कर विजयी झाले आहेत; तर बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटमधून माजी संचालक अशोक वाळुंज विजयी झाले असून त्यांनी राजेंद्र शेळके यांचा पराभव केला. 

ही बातमी वाचली का? दोन हात, एका पायाने चित्र काढणारा अवलिया

भाजी मार्केटमधून शंकर पिंगळ हे विजयी झाले असून त्यांनी के. डी. मोरे यांचा पराभव केला. मसाला मार्केटमधून कीर्ती राणा पराभूत झाले असून तेथे विजय भुत्ता यांनी विजय मिळवला आहे. धान्य मार्केटमधून नीलेश विरा विजयी झाले आहेत. कामगार मतदार संघातून शशिकांत शिंदे व फळ मार्केटमधून संजय पानसरे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती; तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे बाळासाहेब सोईस्कर आणि काँग्रेसचे धनंजय वाडकरांनी विजय मिळवला.

ही बातमी वाचली का? कोंढाणे धरणाचे पाणी सिडकोला देणार नाही

राज्यभरातील निवडणुकीचा आढावा
सहा महसूल विभाग व व्यापारी मतदारसंघामध्ये एकूण १७ हजार ५१३ मतदान झाले होते. महसूल विभागांमध्ये तब्बल ९८.७२ टक्के मतदान झाले; तर व्यापारी मतदारसंघात ८७.२१, अमरावती ९९, कोकण ९९.६४, पुण्यात ९९ टक्के मतदान झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: APMC won the elections in the lead in mahavikas aaghadi