esakal | Mumbai : नेरूळ टर्मिनलवरून लवकरच प्रवासी जलवाहतूक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai : नेरूळ टर्मिनलवरून लवकरच प्रवासी जलवाहतूक

Mumbai : नेरूळ टर्मिनलवरून लवकरच प्रवासी जलवाहतूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : नेरूळमधील जलवाहतूक टर्मिनलचे काम प्रगतिपथावर असून लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्‍यानंतर याठिकाणी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून स्पीड बोट/कॅटमरान सेवेचे परिचालन करण्यात येणार आहे. टर्मिनलच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी शुक्रवारी पाहणी दौरा करीत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

केंद्राच्या जलवाहतूक विकास धोरणांतर्गत मुंबईतील भाऊचा धक्का, नवी मुंबईतील नेरूळ आणि अलिबागजवळ मांडवा येथे मुंबई पोर्ट ट्रस्ट, सिडको आणि महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे जलवाहतुकीकरिता पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. जलवाहतूक टर्मिनल पनवेल खाडीमध्ये स्थूणाधारित फलाटावर (पाईल्ड् प्लॅटफॉर्म) उभारणे प्रस्तावित आहे. यात पोच मार्ग (ॲप्रोच रोड), पोच धक्का (ॲप्रोच जेट्टी), टर्निंग प्लॅटफॉर्म, तरंगता तराफा, लिंक स्पॅन, ब्रिदींग डॉल्फिन्स, इलेक्ट्रिक पॅनल रूम, पाण्याच्या टाक्या, सांडपाणी प्रक्रिया सयंत्र, नेव्हिगेशन एरिया, मार्शलिंग एरिया इ. सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. टर्मिनलअंतर्गत प्रतीक्षालय, रिफ्रेशमेन्ट एरिया, किचन व खाद्यविभाग, तिकीटघर, तपासणी विभाग, स्वच्छतागृहे, बहुउद्देशीय सभागृह, फूड कोर्ट इ. सुविधाही समाविष्ट आहेत.

नेरूळ जलवाहतूक टर्मिनलमधून बोट सेवा सुरू झाल्यावर प्रवाशांना पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळण्याबरोबरच निसर्गरम्य सागरी प्रदेशाचे अवलोकन करण्याची संधी मिळणार आहे. नेरूळ ते भाऊचा धक्का हे ११ किमी सागरी मैलाचे अंतर स्पीड बोट व कॅटमरानद्वारे केवळ ३० ते ४५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. तसेच नवी मुंबई, दक्षिण मुंबई व पुढे अलिबागपर्यंत प्रवासाचा वेळ वाचेल. जलवाहतुकीमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या रस्ते व रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्येचा भारही कमी होण्यास मदत होणार आहे.

नेरूळ जलवाहतूक टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच प्रवाशांकरिता बोट आणि कॅटमरान सेवा सुरू होणार असल्‍याने रस्ते व रेल्वे मार्गांवरील ताण कमी होईल. नवी मुंबईकरांना मुंबईला जाण्यासाठी नवीन पर्याय मिळेल

- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

loading image
go to top