नवी मुंबईत उभारले खास कोव्हिड रुग्णालय; 'इतक्या' खाटांची असणार क्षमता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

नवी मुंबईत पालिकेच्या वतीने वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये तयार केलेल्या कोव्हिड हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले आहे.

वाशी (बातमीदार) :  नवी मुंबईत पालिकेच्या वतीने वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये तयार केलेल्या कोव्हिड हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले आहे. 1200 खाटांची क्षमता असलेले हॉस्पिटल येत्या पाच दिवसात रुग्णांसाठी खुले होणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मोठी बातमी ः कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी ‘येस टू लाईफ...नो टू टोबॅको’ ऑनलाईन मैफल 

वाशी येथील एक्झिबेशन सेंटरमध्ये  उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाची पाहणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने विक्रमी वेळेमध्ये हे हॉस्पिटल तयार केले आहे. या हॉस्पिटलमध्ये डायलेसिस, कोव्हिड टेस्ट, एक्स-रे  या सर्व सुविधा रुग्णांना एकाच छताखाली मिळणार आहेत. या हॉस्पिटलमधील 500 खाटावर रुग्णांना ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात आली असून पाचशे खाटा या ऑक्सिजनविरहीत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना आमदार भरत गोगावले, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, कार्यकारी अभियंता सुनील लाड, अरविंद शिंदे, एसबीआय युनियनचे महासचिव जगदीश शृंगारपुरे, शहरप्रमुख विजय माने आदी उपस्थित होते. 

मोठी बातमी ः काय सांगता..! आता कोरोना रुग्णांवर घरच्या घरी उपचार? वाचा कसा तो...

एपीएमसीमध्ये कोव्हिड सेंटर
एपीएमसी मधील कोरोना बाधित रुग्णांची धावपळ होऊ नये यासाठी चारशे खाटांचे हॉस्पिटल एपीएमसी च्या आवारात उभ्या करण्याच्या सूचना नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांना दिल्या. हे सेंटर माथाडी भवन समोरील इमारतीमध्ये उभे राहणार आहे. यासाठी महापालिका सर्व सहकार्य करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special corona hospital setup at vashi exhibition centre