खारघरमधील रस्त्यांच्या कामाला वेग  

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

धूळ खात पडलेल्या प्रस्तावाला मंजुरी; सिडकोकडून १४ कोटी रुपयांचा खर्च 

खारघर :  मुख्यमंत्र्यांच्या तळोजा येथील मेट्रो रेल्वेच्या कार्यक्रमामुळे वर्षभरापासून धूळ खात पडलेल्या प्रस्तावाला सिडकोकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे टाटा हॉस्पिटलकडून तळोजाकडे आणि सेक्‍टर- ३० ते ३४ मधील रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या कामासाठी सिडको १४ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्‍त करण्यात येत आहे.

तळोजा मध्यवर्ती कारागृहाकडून तळोजाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गगनचुंबी इमारतीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर सेक्‍टर- ३४-३५ मधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे परिसरातील रस्त्याचे काम सिडकोने हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी अनेक वेळा सिडकोकडे केली. तसेच परिसरातील रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला; मात्र वरिष्ठ दुर्लक्ष करीत होते. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे तर मागील महिन्यात हरेश केणी यांनी सिडकोला पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा दिला होता. राजकीय कार्यकर्त्यांचा दबाब पाहून स्थानिक अधिकारी किरकोळ काम करून घेत होते; मात्र रस्ते नूतनीकरणाच्या कामाकडे दुर्लक्ष करीत होते. तळोजा येथील मेट्रोच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री तळोजा येथे येणार असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना खारघरमधील सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स आणि प्रस्तावित खारघर कॉर्पोरेटमार्गे तळोजा निदर्शनास यावे, असा कयास वरिष्ठ अधिकाऱ्यांचा होता. मात्र सेंट्रल पार्ककडून तळोजाकडे जाणाऱ्या रस्त्याची बिकट अवस्था असल्याचे पोलिसांकडून समजल्यावर वरिष्ठांनी रस्त्याची पाहणी केली. या वेळी रस्त्यांचे काम का केले जात नाही, असा सवाल वरिष्ठांनी खारघरच्या अधिकाऱ्यांना विचारला असता वर्षभरापासून प्रस्ताव मुख्यालयात पडून असल्याचे निदर्शनास आले. यामुळे अधिकाऱ्यांनी धूळ खात असलेल्या प्रस्तावाचा शोध घेत दोन दिवसांत प्रस्ताव मंजूर करून कामाची निविदा काढली आहे. 

टाटा हॉस्पिटलकडून तळोजाकडे जाणारा रस्ता आणि सेक्‍टर ३४-३५ मधील रस्त्यांची निविदा काढण्यात आली आहे. निवडणूक झाल्यावर पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- रमेश गिरी, कार्यकारी अभियंता, सिडको

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Speed ​​up road work in Kharghar