
Bullet Train Project : प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; महाराष्ट्रात ९८ टक्के भूसंपादन
मुंबई : राज्यातील सत्ता बदलानंतर केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पाला गती मिळाली आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रकल्पासाठी आतापर्यंत ९८ टक्के भू संपादनाचे काम पुर्ण झाले असून ११८ किलोमीटर अंतरावर खांब आणि गर्डर उभारण्यात आले आहे. बुलेट ट्रेन स्थानक उभारण्याच्या कामाला सुरुवात झाले आहे. रेल्वे मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार बदलताच, बुलेट ट्रेन संदर्भातील रखडलेल्या कामांना वेगाने मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या कामाला वेग आला. महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी ९८.२२ टक्के भूसंपदानाचे काम पुर्ण झाले आहे. तर गुजरातमध्ये ९८.८७ आणि दादरा नगर हवेलीत १०० टक्के भूसंपादनाचे काम पुर्ण झाले असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत या प्रकल्पाच्या उभारणीचे ३० टक्के तर महाराष्ट्रात १३ टक्के काम पुर्ण झाले. हा प्रकल्प ५०८ किलोमीटर लांबीचा असून नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमीटेड हा प्रकल्प पुर्ण करत आहे.