युतीच्या काडीमोडमुळे रिपाइंला "अच्छे दिन'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

मुंबई : शिवसेना- भाजप युती तुटल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला अच्छे दिन आले आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक जागा मिळण्याची शक्‍यता असल्याने आठवले गटाच्या कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे.

मुंबई : शिवसेना- भाजप युती तुटल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला अच्छे दिन आले आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक जागा मिळण्याची शक्‍यता असल्याने आठवले गटाच्या कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडत 2011 मध्ये शिवशक्‍ती- भीमशक्‍तीचा नारा दिला आणि त्यांनी शिवसेनेची साथ धरली. लोकसभा निवडणुकीनंतर आठवले भाजपसोबत गेले असले, तरी 2011 पासून युतीत तणाव निर्माण न होण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान युती अस्तित्वात असताना देखील रिपाइंला मुंबई महापालिकेत 29 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेच्या कोट्यातून 21, तर भाजपने आपल्या कोट्यातील 8 जागा आठवले यांना दिल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत युती तुटल्यामुळे अधिक जागा मिळतील, असे रिपाइंला वाटते. रिपाइंने भाजपकडे सध्या 65 जागांचा प्रस्ताव दिला आहे. यापैकी किमान 45 जागा नक्‍कीच मिळतील, असा विश्‍वास रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली. जागा अधिक मिळल्यास पक्षाला निश्‍चितच फायदा होणार असल्याचा विश्‍वास महातेकर यांनी व्यक्‍त केला. तसेच, उपमहापौरपद आणि अडीच वर्षे स्थायी समितीची मागणी रामदास आठवले यांनी भाजपकडे यापूर्वीच केली आहे.

""युती तुटण्याची घटना दुर्दैवी आहे. यामुळे समविचारी पक्षांच्या मतांमध्ये विभाजन होण्याचा धोका संभवतो, रिपाइंच्या बाबतीत आमच्या मतांवर काही फरक पडेल, असे वाटत नाही.''
- अविनाश महातेकर, राष्ट्रीय सरचिटणीस, रिपाइं

Web Title: split of sena, bjp helps rpi