मोबाईलच्या अतिवापरामुळे विशीतच स्पॉंडिलायसिस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - दिवस-रात्र मोबाईलमध्ये डोके खुपसून राहणे तरुणाईसाठी धोकादायक ठरत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकांना विशीतच स्पॉंडिलायसिस होत आहे. या आजाराला वैद्यकीय क्षेत्रात "टेक्‍स्ट नेक' किंवा "टेक्‍स्टर्स नेक' या नावाने ओळखले जाते.

मुंबई - दिवस-रात्र मोबाईलमध्ये डोके खुपसून राहणे तरुणाईसाठी धोकादायक ठरत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकांना विशीतच स्पॉंडिलायसिस होत आहे. या आजाराला वैद्यकीय क्षेत्रात "टेक्‍स्ट नेक' किंवा "टेक्‍स्टर्स नेक' या नावाने ओळखले जाते.

पाठीच्या मणक्‍यांमधील कुशनला इजा पोचल्याने किंवा हाड वाढल्यामुळे चाळिशीनंतर अनेकांना स्पॉंडिलायसिसचा त्रास जाणवू लागतो; मात्र मोबाईल आणि संगणकाच्या अतिवापरामुळे तरुणांनाही मोठ्या प्रमाणावर हा आजार होत आहे. आठवड्याला खांदा आणि मानदुखीने बेजार असलेले सरासरी 100 रुग्ण उपचारांसाठी येतात.

त्यापैकी सरासरी 25 रुग्णांना मोबाईलच्या अतिवापरामुळे हे आजार जडलेले असतात. त्यात तरुणांची संख्या मोठी असते, असे अंधेरीतील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयातील स्पाइन सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. विशाल पेशत्तीवार यांनी सांगितले. भायखळा येथील जे. जे. रुग्णालयातही असे रुग्ण वाढत आहेत. मोबाईलचा अतिवापर, संगणकासमोर बसून काम करणे आदी कारणांमुळे तरुणांमध्ये खांदेदुखीचे प्रमाण वाढत आहे, अशी माहिती या रुग्णालयातील ऑर्थोपेडिक विभागाचे स्पाइन सर्जन डॉ. धीरज सोनावणे यांनी दिली.

सूर्यनमस्कार घाला !
मोबाईलच्या अतिवापराबरोबरच अपुरा सकस आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे तरुणांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत आहे. रोज व्यायाम केल्यास तसेच सूर्यनमस्कार घातल्यास या दुखण्यापासून काहीशी सुटका होऊ शकते, असा सल्ला डॉ. सोनावणे यांनी दिला.

तरुण वयात शस्त्रक्रिया, औषधांचा वापर करणे योग्य नाही. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा सल्ला आम्ही देतो.
- डॉ. विशाल पेशत्तीवार, स्पाइन सर्जन कोकिळाबेन अंबानी रुग्णालय

Web Title: spondylosis by mobile use health