‘आगरी बोली शालेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

अमित गवळे
गुरुवार, 3 मे 2018

सर्वेश तरे यांनी आगरी बोली जर एका दिवसात शिकायची असल्यास काही सोप्पे नियम सांगितले. ‘ळ’ या अक्षरा ऐवजी ‘ल’ , ‘ण’ या अक्षरा ऐवजी ‘न’ , ‘ड’ या अक्षरा ऐवजी ‘र’ असा शब्द प्रयोग करण्याचा प्रयत्न केला की आगरी भाषा तुम्हाला सहज बोलता येऊ शकेल असे सांगितले.

पाली : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आगरी शाळेच्या प्रशिक्षण वर्गास उत्साहात सुरवात झाली. अागरी बोली भाषेचे जतन व संवर्धन व्हावे, तिचा गोडवा जनसामान्यांना समजावा अाणि अधिकाधिक लोकांना ती शिकता यावी यासाठी या मोफत प्रशिक्षण वर्गाचे अायोजन केले होते. यामध्ये सहभागी झालेले प्रशिक्षणार्थी हे पुणे,अलिबाग, मुंबई, ठाणे, बाळकुम अशा विविध भागातून अाले होते. त्यात आगरी अन बिगर आगरी प्रशिक्षणार्थींचाही सहभाग होता.

आगरात-मीठागरात काम करणारे आगरी आणि त्यांची बोलीभाषाही आगरी. परंतु काळानुरूप या भाषेचे विविध पैलू अाहेत. जसे की कमी शब्दांत व्यक्त होणे, एकाच शब्दाचे अनेक अर्थ असणे, सहज समजणे नवी पिढीपासून लुप्त वा दुर चालले आहेत. 

आगरी भाषेचे विविध अंग कळावे त्यातील साहित्याची गोडी कळावी या अनुषंगाने युवा साहित्यिक सर्वेश तरे यांनी ‘आगरी शाला’ हा बोली भाषा संवर्धनार्थ नविन प्रयोग सुरू केला. या आगरी शालेच्या पहिल्या वर्गाला पंधरा प्रशिक्षणार्थांनी सहभाग नोंदवला. त्यांना गजानन पाटील, प्रकाश पाटील, मोरेश्वर पाटील आणि सर्वेश तरे यांनी मार्गदर्शन केले. 

प्रकाश पाटील यांनी आगरी लुप्त होत चालेलेल्या काही शब्दांची माहिती दिली. मोरेश्वर पाटील यांनी ही भाषा फक्त समाजापुरती मर्यादित नसून तिची व्याप्ती विशाल आणि सर्व समावेशक आहे हे समजवून सांगितले. गजानन पाटील यांनी आगरी बोलीचा व्यवहारात कसा वापर करता येऊ शकतो हे सांगितले. या शाळेचे पुढील वर्ग शनिवार-रविवार भरणार असून एकाच दिवशी दोन सत्रांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. 

पुढील ‘आगरी शालेचे वर्ग’ ५-६ मे, १२-१३ मे तसेच १९-२० मे रोजी कशेळी येथील शाळेत ४ ते ६ या वेळेत भरणार अाहेत. या वर्गासाठी प्रा.सदानंद पाटील, प्रा.एल.बी पाटील, डाॅ.अनिल रत्नाकर, दया नाईक, प्रकाश पाटील, मोरेश्वर पाटील,गजानन पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या आगरी शाळेत कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर ९०९६७२०९९९ यावर संपर्क साधण्याचे कवी सर्वेश तरे यांनी आवाहन केले अाहे. हे प्रशिक्षण शिबिर मोफत असणार आहे.

Web Title: Spontaneous response to Agari Boli Shala