"जीएसटी', "व्हॉट्‌सऍप'चे हसत-खेळत शिक्षण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मुंबई - "हसत-खेळत' शिक्षण या तत्त्वानुसार दहावीच्या काही पुस्तकांची निर्मिती झाल्याचे सुखद चित्र आज पाहायला मिळाले. बुधवारीच बाजारात आलेल्या दहावीच्या गणिताच्या पुस्तकात सेवा व वस्तूकर (जीएसटी) आणि प्राप्तिकरासंबंधीची माहिती आहे, तर व्हॉट्‌सऍप चॅटच्या माध्यमातून संस्कृतचा धडा पाहायला मिळेल. 

मुंबई - "हसत-खेळत' शिक्षण या तत्त्वानुसार दहावीच्या काही पुस्तकांची निर्मिती झाल्याचे सुखद चित्र आज पाहायला मिळाले. बुधवारीच बाजारात आलेल्या दहावीच्या गणिताच्या पुस्तकात सेवा व वस्तूकर (जीएसटी) आणि प्राप्तिकरासंबंधीची माहिती आहे, तर व्हॉट्‌सऍप चॅटच्या माध्यमातून संस्कृतचा धडा पाहायला मिळेल. 

दैनंदिन व्यवहाराचे ज्ञान मिळावे, यासाठी दहावीच्या गणिताच्या पुस्तकात आता "जीएसटी' आणि प्राप्तिकराच्या धड्याचा समावेश करण्यात आला आहे. घोकंपट्टीला छेद देत कृतीयुक्त अशी ही शिक्षणपद्धत दहावीच्या पुस्तकांत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. या प्रत्येक पुस्तकाला क्‍यूआर कोड असून, हा कोड गुरुवारपासून (ता. 5) कार्यान्वित होईल. 

मराठी माध्यमाच्या पुस्तकांची वैशिष्ट्ये - 
- गणित भाग 1 व भाग 2 : "जीएसटी' आणि प्राप्तिकराची माहिती दहावीच्या गणिताच्या पुस्तकातून विद्यार्थ्यांना मिळेल. तीन समीकरणे सोडवण्यासाठीचा क्रेमरचा सिद्धांत या पुस्तकात आहे. 
- विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 व भाग 2 : घरातील सर्व इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे यांचा वापर, तसेच स्वयंरोजगाराचा दृष्टिकोन आणि ऐतिहासिक घटनांचा संदर्भही यात आहे. विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र, तर भाग 2 मध्ये जीवशास्त्र, पर्यावरण, अवकाश, हवामान, आपत्ती व्यवस्थापन, सूक्ष्मजीवशास्त्र आदींचा समावेश आहे. 
- मराठी : साहित्याचा भावार्थ सहज समजेल, प्रश्‍नांच्या उत्तरांची उकल विद्यार्थी सहज आपल्या भाषेतून करतील, या पद्धतीने मराठीचे पुस्तक तयार झाले आहे. कथालेखन आणि विद्यार्थ्यांना आपली अभिव्यक्ती करता येईल याकडे या पुस्तकाकडे लक्ष देण्यात आले आहे. 
- संस्कृत : वेदातल्या कथा, उपनिषदांच्या गोष्टी, आधुनिक काव्य यांच्या समावेशासह चक्क व्हॉट्‌सऍप चॅटमधून संभाषणाचा धडा दिला आहे. 
- भूगोल : भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास करायला भूगोलच्या अभ्यासात संधी आहे. या दोन्ही देशांचे भौगोलिक साम्य, मिश्र अर्थव्यवस्था आदी समान घटकांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक धड्यातून बुद्धीला चालना मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. 
- इतिहास व राज्यशास्त्र : इतिहास लेखनाचे सिद्धांत या पुस्तकांत पाहायला मिळेल. पाश्‍चात्त्य आणि आधुनिक भारतीय परंपरा यासह भारतीय प्रसारमाध्यमांच्या बदलत्या टप्प्यांचाही ऊहापोह पुस्तकात आहे.

Web Title: ssc book education maharashtra