
ST च्या वायूवेग पथकांकडून सर्वसामान्यांची आर्थिक लूट
मुंबई : एसटी महामंडळाच्या भरारी पथकांकडून खासगी वाहनांना थांबवून दमदाटी कारवाईच्या नावावर त्यांच्याकडून पैशांची मागणी केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील धामणी मार्गावर ही घटना घडली असून, यासबंधीत मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाच्या उप महाव्यस्थापकांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर तडकाफडकी याप्रकरणी नागपूर येथील वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी धम्मरत्न डोंगरे यांना चौकशीचे आदेश दिले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाच्या मार्फत वायूवेग पथकांची निर्मिती केली जाते. या पथकामध्ये पोलीस विभाग, आरटीओ आणि एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असतो. यामध्ये पथकासोबत राहून, चोरट्या मार्गाने होणाऱ्या प्रवासी वाहतुकीवरील कारवाईच्या नोंदी करून त्याचा अहवाल एसटी प्रशासनाला पाठवण्याचे काम पथकातील एसटीच्या सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांचे असते. मात्र, या पथकाने चक्क उमेश राठोड यांची खासगी गाडी थांबवून त्यांच्याकडे पियुसी नसल्याचे सांगत 500 रुपयांची मागणी केली.मात्र, राठोड यांच्याकडे तेवढे पैसे नसल्याने अखेर 200 रुपये घेऊन दंडाची पावती न देताच वायूवेग पथकाने पळ काढण्याचा आरोप राठोड यांनी केला आहे.
या पथकामध्ये एसटी महामंडळाच्या वर्धा विभागातील वायूवेग पथकाचे एएसआय उदय दमाये, पोलीस विभागातील वाहतूक शाखेचे एएसआय संजय मेंढे तर पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर आमनेर आणि एसटीच्या एका चालकांचा समावेश आहे. याप्रकरणी एक ऑडिओ क्लिप एसटी उप मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्यानंतर आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
संबंधित संपूर्ण प्रकरणाचा वस्तुस्थिती अहवाल मागवण्यात आला आहे. चोरट्या वाहतुकीवर केसेसची नोंद घेऊन कार्यालयाला अहवाल पाठवण्याचे काम पथकातील एसटी कर्मचाऱ्यांचे असते. मात्र, ऑडिओ क्लिपमध्ये दमदाटी करून वाहनाच्या कागदपत्रांच्या नावावर पैशाची मागणी करण्याचे काम एसटी कर्मचाऱ्यांचे नाही. जे पैसे मागितले ते पोलिसांनी मागितले असेल याची चौकशी करण्यात येईल
- सोमनाथ तिकोटकर, उप मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी
Web Title: St Bus Air Velocity Squad Complaint
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..