एसटी कामगारांच्या गणवेशाला विलंब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

मुंबई - एसटी महामंडळाने बसचालक, वाहकांसह यांत्रिकी विभागातील कामगारांसाठी नवीन गणवेश तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात "एनआयएफटी'शी (नॅशनल इन्स्टिट्यूट फॅशन टेक्‍नॉलॉजी) चर्चा करून नव्या गणवेशावर चार महिन्यांपूर्वी शिक्‍कामोर्तब करण्यात आले. या कामासाठी निविदाही मागवण्यात आल्या; मात्र निविदेतील काही तांत्रिक चुकांमुळे एसटीकडून सात दिवसांपूर्वीच पुन्हा निविदा मागवण्यात आल्या. त्यामुळे एसटी कामगारांना नवीन गणवेश मिळण्यास विलंब होणार आहे.

केंद्राच्या "एनआयएफटी'कडून एसटीच्या कामगारांसाठी नवीन गणवेशाचे डिझाईन तयार केले आहे. चालक व वाहकांसाठी उठावदार असा खाकी रंगाचा गणवेश असून, त्यावर एसटीचे बोधचिन्ह आणि कर्मचाऱ्याचे नाव असेल. चालक व वाहकांच्या या गणवेशावर रेडियमच्या दोन पट्ट्या असतील. बस रस्त्यात बिघडल्यास किंवा अपघात झाल्यास रात्री मदत मागणाऱ्या किंवा काम करणाऱ्या चालक व वाहकांना यामुळे ओळखता येईल. यांत्रिकी विभागातील कामगारांसाठी गडद निळा आणि करड्या रंगाचा गणवेश असेल. सुरक्षेचे सर्व मापदंड आखून अग्निरोधक असा गणवेश त्यांच्यासाठी ठरविण्यात आला आहे. साहित्य ठेवण्याची सोयही या गणवेशात असेल.

Web Title: st employee uniform late