भाडेवाढीनंतरही एसटीला सुखद "धक्का'

ब्रह्मा चट्टे
शुक्रवार, 22 जून 2018

प्रवाशांची पसंती कायम; तिजोरीत दररोज चार कोटींची भर
मुंबई - प्रवासी भाड्यात 18 टक्के वाढ करूनही प्रवाशांची एसटीलाच पसंती मिळत आहे. भाडेवाढीने प्रवासी पाठ फिरवण्याची धास्ती बाळगलेल्या महामंडळाच्या तिजोरीत आता दररोज चार कोटी रुपयांची भर पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रवाशांची पसंती कायम; तिजोरीत दररोज चार कोटींची भर
मुंबई - प्रवासी भाड्यात 18 टक्के वाढ करूनही प्रवाशांची एसटीलाच पसंती मिळत आहे. भाडेवाढीने प्रवासी पाठ फिरवण्याची धास्ती बाळगलेल्या महामंडळाच्या तिजोरीत आता दररोज चार कोटी रुपयांची भर पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एसटीचा दररोजचा महसूल भाडेवाढीपूर्वी 19 कोटी रुपये होता. तो आता 23 कोटींवर गेला आहे. सध्या महामंडळाला वार्षिक 544 कोटींचा तोटा होत आहे. त्यात आता वेतनवाढीच्या 1200 कोटींची भर पडली आहे. एसटीचा एकूण वार्षिक तोट्याचा आकडा 1744 कोटींपर्यंत जाण्याची शक्‍यता होती. अशावेळी भाडेवाढीतून उत्पन्नात एक हजार कोटींची भर पडण्याची शक्‍यता आहे.

इंधन दरवाढीमुळे महामंडळावर दर वर्षी सुमारे 460 कोटी रुपयांचा बोजा वाढला आहे. एसटी कामगारांना नुकतीच 4849 कोटी रुपयांची वेतनवाढ देण्यात आली. यामुळे महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. महामंडळाचा आतापर्यंतचा संचित तोटा 2300 कोटी आहे. तो कमी करण्यासाठी महामंडळाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

भाडेवाढीनंतर एसटीच्या महसुलात घट होण्याची चिंता व्यवस्थापनाला सतावत होती; मात्र एसटीला प्रवाशांनी सुखद धक्का दिला आहे. त्यांनी एसटीलाच पसंती दिल्याने महसुलात घसघशीत वाढ होत आहे.

एसटीचे रोजचे प्रवासी 67 लाखांपर्यंत आहेत. भाडेवाढ केल्यामुळे यात दहा लाखांपर्यंत घट होण्याची शक्‍यता महामंडळाने गृहीत धरली होती. तसे झाले तरी भाडेवाढीमुळे उत्पन्नात दोन कोटींची वाढ होण्याची अपेक्षा महामंडळाला होती. प्रत्यक्षात महसुलात घसघशीत चार कोटींची वाढ झाल्याने प्रवाशांनी एसटीलाच पसंती दिल्याचे स्पष्ट होते.

एसटीच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबरच छोट्या-छोट्या मार्गांवरही गाड्या सोडल्या जातात. त्याचबरोबर 20 किलोपर्यंतच्या सामानाला परवानगी दिली आहे. त्यामुळे एसटीचे प्रवासी वाढत आहेत. गाड्या नियमित सोडल्यामुळेही प्रवासी खासगी गाड्यांपेक्षा एसटीकडे वळत आहेत.
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री

19 कोटी रोजचा महसूल
23 कोटी सध्याचा महसूल
544 कोटी वार्षिक तोटा
460 कोटी इंधन दरवाढीमुळे वाढलेला बोजा
(आकडे रुपयांत)

Web Title: ST rent increase profit