एसटीचा दिलासा; गणेशोत्सवासाठी 2200 जादा बस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीने तब्बल 2200 जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे आरक्षण 27 जुलैपासून सुरू होईल
 

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई आणि उपनगरांतील चाकरमान्यांना एसटीने दिलासा दिला आहे. चाकरमान्यांना कोकणातील घरी सुखरूप पोहचवण्यासाठी एसटीने तब्बल 2200 जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ त्यांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे. 27 जुलैपासून जादा एसटी सेवेसाठी आगाऊ आरक्षण सुरू करण्यात येणार आहे.
 
गणपती उत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मुंबईतील चाकरमान्यांची गर्दी असते. दरम्यान रेल्वे-एसटी प्रवासी सेवेची कोंडी झालेली असते. त्यामुळे एसटीतर्फे 2200 जादा बस सोडण्यात येणार आहे. 27 जुलैपासून प्रवाशांना आगाऊ आरक्षण करता येणार आहे. 

28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या वर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचेदेखील आरक्षण एकाच वेळी म्हणजे 27 जुलैपासून करता येणार आहे. 

ग्रुप बुकिंगची सुविधा 
कोकणात जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गटागटाने बस आरक्षित करतात. मुंबईतल्या विविध उपनगरांतील प्रवासी एकत्र येऊन कोकणातील एकाच गावी किंवा सलग असणाऱ्या गावात जाण्यासाठी एसटीची बस आरक्षित करतात. तशी बस त्यांना सोयीची ठरते. अशा गट आरक्षणाला शनिवार, 20 जुलैपासून सुरुवात होत आहे. संबंधित प्रवाशांनी अशा बुकिंगसाठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

14 ठिकाणाहून जादा बस सुटणार 
28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर अशा पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील 14 बसस्थानके व बसथांब्यांवर एसटीचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. परतीच्या प्रवासासाठीसुद्धा 7 ते 12 सप्टेंबरदरम्यान कोकणातील स्थानिक बसस्थानकावरून जादा बसची सोय करण्यात आली आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथके तैनात केली गेली आहेत. प्रवाशांना प्रवासात तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: St will arrange over 2200 additional buses for ganeshotsav in konkan