"वास मारणारं पॅकिंगचं निकृष्ठ अन्न खावं लागतं", मुंबईकरांच्या मदतीला धावून आलेल्या ST कर्मचाऱ्यांचा टाहो

प्रशांत कांबळे
Monday, 19 October 2020

कोरोनामुळे सध्या लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी धावत आहेत. 

मुंबई, ता.19 - कोरोनामुळे सध्या लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी धावत आहे. मात्र दुसरीकडे अनलॉकींगमुळे कार्यालये, दुकाने खुली झाली आहे. त्यामुळे मुबंईच्या रस्त्यावर प्रवास कोंडी वाढली आहे. ही गर्दी सामावून घेण्यासाठी एसटीने मुबईला मदतीचा हात दिला. बेस्टच्या मदतीसाठी इतर विभागातून 1000 एसटी बसेस मागविण्यात आल्या आहे. मुंबईकरांच्या मदतीसाठी धावून आलेल्या इतर राज्यातील कानाकोपऱ्यातील साडेतीन हजार एसटी कर्मचाऱ्यांना मात्र धड माणूसकीची वागणूक मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यांच्या झोपण्याचे, जेवणाचे प्रश्न सुटला सुटत नाही. 

राज्यातून मुंबईकरांना प्रवासाची सेवा द्यायला आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना  पहिल्या दिवशी राहण्याचे ठिकाण नव्हते, जेवणाची सोय नव्हती. कशीबशी राहण्याची व्यवस्था झाली तर आता, जेवण निकृष्ठ दर्जाचे मिळत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांकडून केल्या जातोय. रात्री उशीरा कामावरून परत आल्यानंतर मिळत असलेल्या जेवणाचा वास येत असल्याने, कर्मचारी जेवणच करत नाही. त्याशिवाय इतर ठिकाणी कुठेही जेवणाची सोय नसल्याने उपाशीपोटीच रात्र काढावी लागत आहे. 

महत्त्वाची बातमी : राज ठाकरे पोहोचलेत लिलावातीमध्ये, ठाकरे कुटुंबियांसाठी भावुक क्षण

एसटी महामंडळाने या सर्व कर्मचाऱ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्याचे कंत्राट ओयो हॉटेल कंपनीला दिले आहे. कंपनीने वातानुकूलीत आणि विनावातानुकूलीत हॉटेलमध्ये या कर्मचाऱ्यांना ठेवले आहे. एका रूम मध्ये तिन कर्मचाऱ्यांना राहता येते, तर दोन वेळचे जेवण आणि एक वेळचा नाश्ता या ओयो हॉटेल कंपनीकडून दिला जातो जाते. मात्र, जेवणचं निकृष्ठ असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून सातत्याने केला जात असल्याने, कर्मचाऱ्यांचे हाल संपणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आगार निहाय बसेसची सेवा
एसटी विभाग - बसेस संख्या - बसेस पाठविण्याचे ठिकाण

 • अहमदनगर - 100 - कुर्ला नेहरू नगर
 • सातारा - 100 - बोरीवली नॅन्सी काॅलनी
 • सोलापूर - 100 - बोरीवली नॅन्सी काॅलनी
 • धुळे - 100 - ठाणे (सी बी एस)
 • रत्नागिरी  - 100 - परळ आगार 
 • सांगली - 100 - मुंबई सेंट्रल आगार 
 • बीड - 100 - कुर्ला नेहरू नगर 
 • कोल्हापूर - 100 - परळ आगार 

कर्मचाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल
आम्ही काय जनावर आहोत का? तिन महिने पगार देत नाही. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मुंबईत कोरोनाची भिती आहे. तरी सुद्धा मुंबईतील प्रवासी सेवेसाठी दाखल झालो आहे. मात्र, वास येत असलेले अन्न खायला मिळत असून उद्या जिवाचे काही बरवाईट झाल्यास याला जबाबदार कोण ? असा आशयाचे व्हिडीओ सुद्धा संतप्त एसटी कर्मचाऱ्यांकडून सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. 

महत्त्वाची बातमी : फेक टीआरपी प्रकरण! अर्णब गोस्वामी मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करणार

दोन शिफ्ट मध्ये कर्मचाऱ्यांचे काम

पहिल्या शिफ्टसाठी सकाळी 5 ते 7.30 वाजेपर्यंत कर्मचारी पहिल्या शिफ्टच्या कामावर रूजू होतात. त्यानंतर 12.30 ते 3 वाजेपर्यंत, सुमारे आठ तासानंतर कामावरून सुटतात, त्यानंतर दुसऱ्या शिफ्टसाठी 3 वाजेपर्यंत कर्मचारी कामावर येतात. त्यानंतर सुमारे 12.30 वाजता नंतर कामावरून हॉटेलवर येतात. 

एसटी कर्मचाऱ्यांपुढील अडचणी काय ?

 • सॅनीटाझर, मास्क अशा आवश्यक वस्तू मिळत नाही
 • मुंबईत दाखल झाल्यापासून गाड्या नियमीत सॅनिटाईज होत नाही
 • कामगारांची दैनंदिन आरोग्य तपासणी होत नाही
 • आजारी कर्मचाऱ्यांचा उपचार सुद्धा केला जात नाही.
 • वास येत असलेले पॅकिंगचे निकृष्ठ अन्न नाईलाजास्तव खावे लागते आहे.
 • आठ दिवसाच्या कामाचा कालावधी अचानक वाढवला
 • कामाच्या ठिकाणापासून राहण्याची सोय अडिच तासाच्या अंतरावर

उलटा आरोप 

राज्यातील इतर विभागातून आलेल्या कर्मचाऱ्यांना राहण्याची आणि जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी ओयो कंपनीला कंत्राट देऊन उत्तम सुविधा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांकडूनच मद्यप्राशन करून धिंगाणा घातला जात आहे. चांगल्या हॉटेलमध्ये ठेवले असतांनाही, त्याठिकाणी मद्यांच्या बाटल्यांचा खच निघाला असल्याने, कर्मचाऱ्यांकडूनच राहण्याच्या ठिकाणी गैरवर्तन केले जात असल्याचा एसटीच्या अधिकाऱ्याने नाव न लिहीण्याच्या अटीवर सकाळशी बोलताना सांगितलं आहे.

महत्त्वाची बातमी : जलवाहिनी फुटून जमलेल्या पाण्यात लीक झाला होता करंट, झटक्याने दोन BMC कर्मचारी दगावलेत 

दोन कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह

सांगली विभागातील तासगाव आणि विटा डेपोचे एकूण दोन कर्मचारी कर्मचाऱ्यांपैकी दोन कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह निघाले आहे. त्यानंतर ही त्यांच्या संपर्कात असलेल्या एकाही कर्मचाऱ्यांची तपासणी केली नसून, त्यांना विलगीकरणात सुद्धा ठेवण्यात आले नाही. त्यामूळे तब्बल 25 ते 30 कर्मचाऱ्यांना सर्दी, खोकला, घसा दुखण्यामूळे ग्रस्त आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतरही त्याची दखल घेत नसून, कर्मचाऱ्यांना सतत कामच करावे लागत असल्याने, कोरोना पॉझिटीव्ह होण्याची भिती एसटी कर्मचाऱ्यांना वाढत आहे. 

बाहेरून आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची सोय केली आहे. मात्र, येवढ्या मोठ्या प्रमाणातील कर्मचाऱ्यांची सोय करतांना काही अडचणी येत आहे. मात्र, अडचणी सोडविण्याचा पुर्णपणे प्रयत्न केला जात असून लवकर त्या समस्या सुटणार आहे.  - राहूल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी वाहतूक

कोरोना पाॅझिटीव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचं विलगीकरण होणे आवश्यक आहे. अन्न निकृष्ठ आणि अपुरे मिळत असल्याबाबत आम्हीही वरीष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत पण सडलेले अन्न काही ठिकाणी आढळून आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ही अत्यंत चीड देणारी बाब आहे म्हणून चौकशीअंती दोषींवर कारवाई झाली पाहीजे. ठेकेदारांना पैसे मोजूनही अन्न खराब मिळत असेल तर रोख पैसे द्यायला हवेत व कामगारांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य द्यावे, असं राज्य एसटी कामगार संघटना अध्यक्ष संदीप शिंदे यांनी म्हटलंय. 

महत्त्वाची बातमी : सावधान... मायोपिया बळावतोय! डोळे सांभाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

दरम्यान ओयोच्या मार्केटींग अधिकारी अरुण पारीक यांना संपर्क केला असतांना त्यांनी या विषयावर बोलायला नकार दिला आहे. 

( संकलन - सुमित बागुल ) 

st workers who came from various places for mumbaikar shared their problem


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: st workers who came from various places for mumbaikar shared their problem