सरकारकडून खाजगी सुरक्षारक्षकांनंतर आता वकिलांनाही मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा

प्रशांत कांबळे
Thursday, 22 October 2020

 ठराविक कालावधीतच करता येणार प्रवास

मुंबई : नुकतेच सरसकट महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारने आता, वकिलांना आणि खासगी गार्ड यांनाही लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने खासगी गार्डला परवानगी देत असल्याचे सांगितले असून, वकिलांबद्दल असे कोणतेही पत्र अद्याप रेल्वे विभागाला प्राप्त झाले नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, यासंदर्भात रेल्वे सकारात्मक असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे.

महत्त्वाची बातमी : ठाणेकरांच्या स्वतंत्र धरणासाठी शिवसेनेला जाग येईल का? भाजपची खरमरीत टीका 

सरसकट सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यासाठी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन विभागाकडून रेल्वे आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे सत्र सुरू आहे. दरम्यान सुरुवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी होती. त्यानंतर नुकतेच सरसकट महिलांना निश्चित वेळेत लोकलमध्ये प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यानंतर आता वकील आणि खासगी सुरक्षा गार्ड यांना सुद्धा लोकल प्रवास करता येणार आहे.

महत्त्वाची बातमी : पालघर साधू हत्या प्रकरण : दोन दिवसांत CID कडून 32 आरोपींना अटक

पहाटे लोकल सुरू होण्यापासून सकाळी  8 वाजेपर्यंत, त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 4 आणि संध्याकाळी 7 नंतर शेवटची लोकल असेपर्यंत प्रवासाची वकिलांना मुभा असणार आहे. गर्दीच्या वेळी वकिलांना प्रवास करता येणार नाही. मासिक पासही मिळणार नाही, प्रत्येक प्रवासासाठी जाताना आणि येताना वेगवेगळे तिकीट काढावे लागणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कॉउंसिलच्या अधिकृत ओळखपत्रावरच तिकीट मिळणार आहे. अधिकृत कामासाठीच प्रवास करता येणार आहे. खाजगी कामासाठी प्रवास करता येणार नाही. लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळावी यासाठी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. वकील आणि त्यांच्याकडील नोंदणीकृत कारकून लोकलने प्रवास करू शकणार आहेत.

( संपादन - सुमित बागुल )

state government allows advocates to travel by mumbai local trains


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government allows advocates to travel by mumbai local trains