राज्य सरकारने थेट जनतेच्या बॅक खात्यात पैसे जमा करावे; भाजप आमदारीची मागणी

सुजित गायकवाड - सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 July 2020

  • शहरातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाईक यांनी नवे आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. या दरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाईकांनी उपाय-योजनांची माहिती दिली. 

नवी मुंबई : राज्य सरकारने जगण्यासाठी लोकांना पैसे द्यायला हवे आहे, जनतेच्या पडत्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सरकारने जनतेच्या बँक खात्यावर पैसे टाकण्याची गरज आहे. अशी मागणी ऐरोलीचे भाजप आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी सरकारकडे केली आहे. या काळात सरकारने जनतेला मदत केल्यास जनता त्याची नक्की परतफेड करेल असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला. शहरातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाईक यांनी नवे आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. या दरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाईकांनी उपाय-योजनांची माहिती दिली. 

वाचा पोटासाठी मृत्यूशी दोन हात करण्यास तयार! महामारीतही आरोग्य विभागातील भरतीला मोठा प्रतिसाद

नवी मुंबईत कोरोनाचे वाढते रुग्ण कमी करण्यासाठी कठोर अंमलबजावणी करणारा 20 दिवसांचा लॉकडाऊन घ्यायला हवा याचा नाईक यांनी पुनरुच्चार केला. टाळेबंदीच्या काळात नागरिकांनी शाळेच्या फी कशा भरायच्या या प्रश्नावर नाईक यांनी जनतेला सरकारने मदत करायला हवी असे मत व्यक्त केले. सरकारने जनतेच्या बँक खात्यावर रक्कम टाकायला हवी. ज्यावेळेस सर्व सुरळीत होईल तेव्हा त्यांच्याकडून पैसे परत घ्या. जनता नक्की पैसे परत करेल बुडवणार नाही असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. आपण याआधी देखील सरकारने महावितरणला अर्थसहाय करण्याची मागणी केल्याचे सांगितले. नाईक यांनी बांगर यांची भाजपच्या माजी नगरसेकांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेऊन कोरोनाबाबत चर्चा केली. या चर्चेत वाशी, नेरुळ आणि ऐरोली हे तीन रुग्णालय नॉन कोव्हीड रुग्णालय करण्यावर भर असल्याचे सांगितले. 

वाचा सिडको गृहधारकांसाठी महत्वाची बातमी! कागदपत्रांची पडताळणी होणार ऑनलाईन... अधिक माहितीसाठी वाचा

महापालिकेचा रुग्णालय फक्त कोव्हीडसाठी वापरला जात असल्याने सामान्य रुग्णांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे त्यांची होणारी घुसमट थांबवायची असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. तसेच शहरातील एकही रुग्ण व्हेंटिलेटरअभावी दगावू नये म्हणून व्हेंटिलेटर खरेदी करण्याची मागणी नाईक यांनी महापालिकेकडे केली आहे. 

 

भर्तीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या

नवी मुंबई महापालिके मार्फत घेतल्या जाणाऱ्या भर्ती प्रक्रियेत स्थानिक नागरिक, प्रकल्पग्रस्त आणि झोपडपट्टीतील नागरिकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी भाजप आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे. बाहेरचे नागरिक येऊन शहरात कोरोना वाढ होण्यापेक्षा नवी मुंबईतील मुलांना घ्या अशी मागणी केल्याचे नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली.

----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state government should deposit money directly into the public bank account; BJP demands MLA