ऑक्सिजनच्या मागणीत वाढ, आरोग्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

पूजा विचारे
Monday, 7 September 2020

कोरोना रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनच्या मागणीत वाढ होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. अशातच कोरोना रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनच्या मागणीत वाढ होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

या मागणीची तातडीनं दखल घेण्यात आली आहे. साथरोग नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करत वैद्यकीय प्राणवायू उत्पादन करणाऱ्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के आणि उद्योगांसाठी २० टक्के प्राणवायू देण्याचे बंधनकारक करण्यात आलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी डिसेंबर २०२० पर्यंत राज्यात लागू असेल, असंही सांगण्यात आलं आहे.

याआधी उद्योग क्षेत्रासाठी ५० ते ६० टक्के आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी ४० ते ५० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. मात्र आताच्या परिस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात कायद्यान्वये बदल करण्यात आला आहे. आता पुरवठ्याचे प्रमाण वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के तर २० टक्के उद्योगांसाठी करण्यात आलेय. यामुळे कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नसल्याची दक्षता घेण्यात आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचाः  Mumbai Rain: मुंबईकर सुखावले! मुंबई ठाण्यात पावसाची हजेरी
 

शरीरासोबत मनाची मशागत आवश्यकः आरोग्यमंत्री

सकारात्मकता आणि इच्छाशक्तीच्या बळावर आपल्याला कोरोनासारख्या महामारीवर विजय मिळवायचा आहे.  कोरोनाने आपल्याला सुदृढ राहायला शिकवले. मात्र, शरिरासोबतच मनाचीही मशागत आवश्यक आहे. यातून आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री यांनी केले.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवावी. योग्य आहार, पुरेशी झोप आणि व्यायाम या सगळ्या गोष्टी कराव्यात. हंगामी सांसर्गिक आजार जसे डेंग्यू आणि मलेरिया यांवर मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती चांगली हवी. यासाठी योग, प्राणायाम यांचेही खूप महत्त्व आहे. कोरोना काळात वाफ घेणे, गरम पाणी पिणे, काढा घेणे यासुद्धा महत्वाच्या बाबी असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचाः  मुंबईत सप्टेंबर महिना ठरतोय रुग्णवाढीचा महिना, धोका वाढतोय

आता आपल्याला आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी शिस्तबद्ध जीवनशैलीची सवय लावून घ्यावी लागेल. जिभेवर आणि मनावर ताबा ठेवूनच सदृढ आयुष्य जगता येईल. तसेच, या काळात जंक फुड खाण्यावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.  याकाळात लोकांना समुपदेश करणे हा महत्वाचा विषय आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांची नोकरी गेली. व्यवसाय ठप्प पडले. मात्र, याने खचून न जाता वाटचाल करत राहावी. यासाठी मनाची मशागत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

State Health Minister Rajesh Tope Take Decision For Corona Virus Patients oxygen


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Health Minister Rajesh Tope Take Decision For Corona Virus Patients oxygen