ठाण्यात बॅनरबाजीमुळे स्वातंत्र्यवीरांचे शिल्प झाकोळले

ठाण्यात बॅनरबाजीमुळे स्वातंत्र्यवीरांचे शिल्प झाकोळले

ठाणे : देशभक्तीचा गजर करणाऱ्या शिवसेनेकडूनच ठाण्यातील स्वातंत्र्य चळवळीतील वीरांचा घोर अपमान केल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील कोर्ट नाक्यावरील प्राचीन अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीची पुर्नस्थापना करताना उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील वीरांच्या शिल्पावर चहूबाजूने फलक लावलेले आहेत. या फलकबाजीमुळे तिरंगा ध्वज घेऊन दौडणारे वीर पूर्णतः झाकोळून गेले आहेत. शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत करणारे हे फलक असून मंगळवारी ठाकरे ठाण्यात येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.    

ठाणे शहरात बॅनरबाजी करणाऱ्यांची मुळीच कमतरता नाही. विविध प्रकारे सण-उत्सव असो व समारंभ नियमावली पायदळी तुडवली जाहीरबाजी केली जात आहे. आता तर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असल्याने सर्वच पक्षातील उमेदवार आपापल्या नेत्यांची तळी राखण्यासाठी फलकबाजी करण्याचे फॅड सर्वत्र वाढले आहे. मात्र, नेत्यांची मर्जी राखण्यासाठी केलेल्या कोर्टनाक्यावरील स्वातंत्र्यवीरांच्या शिल्पावर केलेल्या या फलकबाजीमुळे स्वातंत्र्यवीरांचा घोर अपमान झाला आहे. राज्यात जनआशीर्वाद आटोपून ठाण्यात येत असलेल्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या नेतेमंडळींनी कोर्ट नाक्यावरील तिरंगा ध्वज हाती घेऊन दौडत असलेल्या स्वातंत्र्यवीरांचे शिल्प झाकोळून टाकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.या शिल्पाच्या चहूबाजूने हे स्वागत फलक झळकत असल्याने शिल्पाची रयाच गेल्याची भावना अनेक ठाणेकर नागरिकांनी व्यक्त केली.

फलकबाजी करण्यासाठी ठाणे महापालिकेने नियमावली आखून दिली आहे. तरीही सर्व नियम धाब्यावर बसवून बॅनर लावले गेल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात ठाणे महापालिका उपायुक्त संदीप माळवी याना छेडले असता, त्यांनी देशाभिमान जागवणाऱ्या या शिल्पस्थळी असे फलक लावून विद्रुपीकरण करणे चुकीचे असल्याचे म्हटले असून, तातडीने शिल्पानजीक लावलेले फलक हटवण्याचे आदेश दिले जातील, असे स्पष्ट केले.

बॅनरबाजांचे 'ठाणे'  

कुठलाही सण-उत्सव असो वा नेतेमंडळींचे वाढदिवस अथवा जाहीर कार्यक्रम शहरातील मोक्याच्या ठिकाणी बॅनर झळकवून फुकट प्रसिद्धी मिळवण्याची संधी कुणी सोडत नाही. रस्ते, चौक, सूचना फलक, वाहतूक पोलिसांच्या केबिन, विद्युत खांब, कमानी आणि मोक्याच्या ठिकाणच्या वास्तूवर बॅनर उभारून सर्रास विद्रुपीकरण करण्यात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आघाडीवर असतात.

काही ठिकाणी पदपथांवर बांबूच्या सहाय्याने तर काही ठिकाणी दुभाजकांवरही फलकांची जत्रा फुललेली असते. यामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा तर येतेच किंबहुना भावी ठाणेकरांना तसेच ठाण्यात येणाऱ्या पाहुणे मंडळींना ठाण्याचे वैभव पाहण्यात अडथळे निर्माण होतात. याचा विचारदेखील हे बॅनरबाज करताना दिसत नसल्याचे बोलले जात आहे.

जुन्या ठाण्यातील कोर्ट नाका हे ठाण्याचे खरे वैभव असून याठिकाणी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी उभारलेल्या स्वातंत्र्य लढ्याची आणि शहीदांची आठवण म्हणून असलेला अशोकस्तंभ ठाण्याचा मानबिंदू मानला जात होता. या अशोकस्तंभाला 1983 दरम्यान अपघातात उध्वस्त झाला.

त्यानंतर  स्थानिक आमदार संजय केळकर यांनी आपल्या आमदार निधीतून हा अशोकस्तंभ कोर्ट नाक्यावर पुन्हा उभारून त्याच्या जवळच स्वातंत्र्यवीरांचे तिरंगा ध्वज घेतलेले शिल्पदेखील उभारण्यात आले आहे. देशभक्तीचा प्रत्यय देणाऱ्या याच शिल्पावर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com