अद्यापही साडेसात हजार विद्यार्थी प्रवेशाविना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019


अकरावीची विशेष फेरी गुणवत्ता यादीनंतर देखील नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ 80 टक्के पारच

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची विशेष फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी (ता. 14) दुपारी 3 वाजता जाहीर करण्यात आली. प्रवेशाच्या तीन गुणवत्ता यादीनंतरच्या विशेष फेरीतही नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ 85 टक्‍क्‍यांच्या पलीकडे आहे. त्यामुळे विशेष फेरीनंतरही तब्बल सात हजार 711 विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित असून त्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीची वाट पाहावी लागणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीतील प्रवेशासाठी 56 हजार 375 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी 48 हजार 664 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयाची अलॉटमेंट देण्यात आली आहे; तर सात हजार 711 विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश मिळालेले नाहीत. या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट झाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी 16 व 19 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित  महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश निश्‍चित करायचा आहे.

या फेरीत 28 हजार 568 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. यामध्ये वाणिज्य शाखेच्या 16 हजार 752 विद्यार्थ्यांचा समावेश आहे; तर विज्ञान शाखेतील 7 हजार 979 विद्यार्थ्यांना पहिला पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. त्याखालोखाल कला शाखेतील 3 हजार 91 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज केलेले पहिले महाविद्यालय मिळाले आहे. या फेरीत दुसरा ते दहाव्या पसंतीक्रमातील महाविद्यालय अलॉट झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करायचा नसेल, ते प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीस पात्र ठरू शकतात.

 

प्रवेश न मिळालेल्यांत सर्वाधिक विद्यार्थी वाणिज्य शाखेचे
विशेष फेरीमध्ये वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी 38 हजार 398 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 31 हजार 897 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट झाले आहे; तर सहा हजार 501 विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. विशेष फेरीनंतरदेखील प्रवेशापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे वाणिज्य शाखेचे आहेत.

--------------------------------------------------------

शाखा -         एकूण जागा    एकूण अर्ज      प्रवेशास पात्र विद्यार्थी

कला -               16,229         4,632             4,303
वाणिज्य -            63,105       38,398            31,897
विज्ञान -              44,081      12,523             11,674
एमसीव्हीसी -      3,151          822                790
एकूण विद्यार्थी -   1,26,566    56,375            48,664

दुसऱ्या गुणवत्ता यादीचे कट ऑफ (टक्‍क्‍यांमध्ये)

एचआर महाविद्यालय - कॉमर्स : 83.0
केसी महाविद्यालय - आर्टस्‌ : 74.40 कॉमर्स : 81.40 सायन्स : 48
जय हिंद महाविद्यालय - आर्टस्‌ : 86.20 कॉमर्स : 83.20 सायन्स : 39.20
रुईया महाविद्यालय - आर्टस्‌ : 92.20 सायन्स : 94.80
रुपारेल महाविद्यालय - आर्टस्‌ : 87.60 कॉमर्स : 91.20 सायन्स : 93.20
साठ्ये महाविद्यालय - आर्टस्‌ : 51 कॉमर्स : 85.60 सायन्स : 74.60
डहाणूकर महाविद्यालय - कॉमर्स : 87.80
भवन्स महाविद्यालय - आर्टस्‌ : 56.80 कॉमर्स : 86 सायन्स : 78
एनएम महाविद्यालय - कॉमर्स : 96.20
वझे-केळकर महाविद्यालय - आर्टस्‌ : 89.20 सायन्स : 98.20
झेव्हिअर्स महाविद्यालय - आर्टस्‌ : 95.20 सायन्स : 88.20
के. जे. सोमय्या महाविद्यालय - कॉमर्स : 82.60 सायन्स : 74.20

विशेष फेरीत बोर्डनिहाय प्रवेशास पात्र विद्यार्थी
बोर्ड - एकूण आलेले अर्ज - प्रवेशपात्र विद्यार्थी
एसएससी - 51,971 - 44,757
सीबीएसई - 1,599 - 1,361
आयसीएसई - 1,546 - 1,394
आयबी -7 - 4
आयजीसीएसई - 314 - 271
एनआयओएस - 279 - 242
इतर - 659 - 635
एकूण - 56,375 - 48,664


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: still 7500 students are without admission in mumbai