'कसारा मार्गावर सर्व स्थानकांना लोकल थांबा द्या'; प्रवाशांना वेळेसोबतच आर्थिक भुर्दंड

नरेश जाधव
Sunday, 27 September 2020

कल्याण-कसारा दरम्यान ठराविक स्थानकांवरच थांबत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. 

 

खर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या लोकलमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी वाढत आहे. यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने मध्य रेल्वेने लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यात कसारा लोकलच्या 22 फेऱ्या वाढवण्यात आल्या. परंतु या लोकल कल्याण-कसारा दरम्यान ठराविक स्थानकांवरच थांबत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. 

'शिवसेना आघाडी सरकार एकटी चालवत नसल्याची' राष्ट्रवादीच्या नेत्याने करून दिली आठवण

विविध विभागातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली. बँक कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासास परवानगी दिल्यानंतर लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण वाढले आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सुरुवातीला असलेल्या 24 अप-डाऊन फेऱ्यांमध्ये आता आणखी 22 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला. यातून गर्दी विभागली जाणार असली तरी, या लोकल कसारा, आसनगाव, टिटवाळा याच स्थानकांवर थांबत असल्याने इतर स्थानकातील प्रवाशांना नाहक हेलपाटा मारावा लागत आहे. 

'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनवण्याची भूक'; राऊत-फडणवीस भेटींवर कॉंग्रेसनेत्याची खोचक टीका

कल्याण-कसारा मार्गावरील खर्डी, उंबरमाळी, तानशेत, आटगाव, वासिंद, खडवली, आंबिवली व शहाड या स्थानकावर लोकल थांबणार नसल्याने येथील अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे ही गैरसोय लक्षात घेऊन लोकलना सर्व स्थानकात थांबा देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. 

 

कसारा-कल्याण दरम्यान लोकल थांबा नसलेल्या 8 स्थानकातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यासाठी सवलत देण्यात यावी, जेणेकरून त्यांना निश्चितवेळी कामावर जाता येईल.
- राजेश घनघाव,
अध्यक्ष,
के-3 रेल्वे प्रवासी संघटना

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop local at all stations on Kasara line