पुलांचे आजपासून ऑडिट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

मुंबई - अंधेरीतील पूल दुर्घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या रेल्वे आणि मुंबई पालिका प्रशासनाने हद्दीच्या वादात वर्षानुवर्षे दुरुस्ती आणि पुनर्बांधणीविना रखडलेल्या, धोकादायक स्थितीत असलेल्या पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटच्या कामाला शुक्रवारपासून (ता. 6) सुरवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य तसेच पश्‍चिम रेल्वेच्या हद्दीतील 445 पुलांचे ऑडिट होणार असून, त्यासाठी 12 पथके स्थापन करण्यात आली आहेत. 

पालिका मुख्यालयात आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीत मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीत हा निर्णय झाला. मुंबईत मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या हद्दीत वाहतुकीसाठीचे, पादचारी आणि स्कायवॉक मिळून 445 पूल आहेत. या पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकांमध्ये मुंबई आयआयटी, रेल्वेचे वरिष्ठ अभियंता आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पालिका, मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांदरम्यान नियमित समन्वय राखला जावा, या उद्देशाने दर महिन्याला बैठक घेण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन, पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, पालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे संचालक विनोद चिठोरे, पूल विभागाचे प्रमुख अभियंता शीतलाप्रसाद कोरी आदी या वेळी उपस्थित होते. 

टिळक, एल्फिन्स्टन पुलांना प्राधान्य 
दादर येथील टिळक ब्रिज आणि परळ येथील एल्फिन्स्टन हे दोन पूल धोकादायक स्थितीत आहेत. शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलांच्या स्थितीबाबत नुकतीच पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही चिंता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर या पुलांचे प्राधान्याने स्ट्रचरल ऑडिट करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. 

Web Title: Structural audit of the bridge from today