लंडनमध्ये प्रथमच होणार "स्ट्रगलर साला'चे चित्रीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

मुंबई - वेबसिरीजला सध्या तरुणांची पसंती मिळत असल्याने अल्पावधीतच त्यांना लाखोंनी हिट्‌स मिळत आहेत. मराठी चित्रपटांपाठोपाठ आता मराठी वेबसिरीजनेही मोठी झेप घेतली आहे. "चावट ग्रुप'ची निर्मिती असलेली "स्ट्रगलर साला' वेबसिरीज तर सातासमुद्रापार पोचली आहे. या वेबसिरीजचे चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे.

मुंबई - वेबसिरीजला सध्या तरुणांची पसंती मिळत असल्याने अल्पावधीतच त्यांना लाखोंनी हिट्‌स मिळत आहेत. मराठी चित्रपटांपाठोपाठ आता मराठी वेबसिरीजनेही मोठी झेप घेतली आहे. "चावट ग्रुप'ची निर्मिती असलेली "स्ट्रगलर साला' वेबसिरीज तर सातासमुद्रापार पोचली आहे. या वेबसिरीजचे चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे.

लंडनमध्ये चित्रित होणाऱ्या विशेष भागांमध्ये संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, भाऊ कदम, मंगेश देसाई आदी आघाडीचे कलाकार चमकणार आहेत. लंडन ब्रिज, बर्मिंगहॅम आदी वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण होणार आहे."स्ट्रगलर साला'मध्ये मराठी चित्रपटसृष्टीत स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यातील प्रसंग विनोदी पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडले जातात.

विजू माने वेबसिरीजचे दिग्दर्शक, निर्माता व लेखक असून, त्याचे आठ भाग आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, प्रसाद ओक, मंगेश देसाई, अभिजित चव्हाण, रवी जाधव, महेश मांजरेकर आदींनी त्यात काम केले आहे. दोन स्ट्रगलर कलाकार आपल्या आयुष्यातील काही अनुभव पहिल्यांदाच लंडनमधील प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत.

वेबसिरीजचे दिग्दर्शक विजू माने म्हणाले, ""लंडनमध्येही "स्ट्रगलर साला'चे फॅन्स आहेत. त्यांच्या आग्रहाखातर "स्ट्रगलर साला'च्या टीमला लंडनमध्ये आमंत्रित करण्यात आले. लंडनसारख्या शहरातून आमच्या वेबसिरीजला एवढा मोठा फॅन क्‍लब मिळतोय ही खूप आनंदाची गोष्ट आहे. "स्ट्रगलर साला'नंतरही आम्ही वेगवेगळ्या विषयांवरील वेबसिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत.'

कॉमेडी रोड शोचीही चर्चा
"बाराखडी एंटरटेन्मेंट' व "चावट ग्रुप'च्या वतीने "लई बाराचे' कॉमेडी रोड शो होणार आहेत. युरोपातील मराठी प्रेक्षकांपर्यंत भारतातील मराठी कलाकृती पोचण्याच्या उद्देशाने "बाराखडी एंटरटेन्मेंट'ची निर्मिती झाली आहे. "बाराखडी एंटरटेन्मेंट'ने "एक अलबेला' चित्रपट पहिल्यांदा युरोपात प्रदर्शित केला होता. "लई बाराचे' या कॉमेडी रोड शोमध्ये विविध कला प्रेक्षकांसमोर सादर केली जाणार आहे. संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, विजू माने, मंगेश देसाई, भाऊ कदम, जुईली जोगळेकर, सारा श्रवण, सोहम पाठक आदी कलाकार त्यात काम करणार आहेत. 18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान हा शो "यूके'मध्ये सादर होणार आहे.

Web Title: struggler saala shot in london