वाळूशिल्पातून सामाजिक संदेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

वसईत 13 वी राज्यस्तरीय निसर्ग स्पर्धा 

वसईत 13 वी राज्यस्तरीय निसर्ग स्पर्धा 

विरार: वसईत झालेल्या 13 व्या राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण, वाळूशिल्प स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयातील 556 विद्यार्थी सहभागी झाले होते. व्यक्तिचित्रण स्पर्धेत 96, निसर्ग स्पर्धेत 255 आणि वाळूशिल्प स्पर्धेत 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. वाळूशिल्पातून विविध सामाजिक पैलू दर्शवत संदेश देण्यात आला. ही शिल्पे पाहण्यासाठी समुद्रकिनारी गर्दी झाली होती. 
वसई विकासिनी संचालित वसई विकासिनी दृक्‌कला महाविद्यालय आणि वसई-विरार महापालिकेतर्फे 13 वे राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्ग चित्रीकरण, व्यक्तिचित्र व वाळूशिल्प स्पर्धा 2017 घेण्यात आल्या. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, चर्नी रोड येथील मुंबई कला विद्यालय, गिरगावातील कलाविद्या संकुल, दादरमधील मॉडेल आर्ट, डोंबिवलीतील करंदीकर कला निकेतन, सांगलीतील कलाविश्व, सातारा स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे स्कूल ऑफ आर्ट, औरंगाबादचे शासकीय कला महाविद्यालय, काशीक कला निकेतन, पुण्यातील अभिनव कला विद्यालय, ठाणे स्कूल ऑफ आर्ट, मुंब्रा कला विद्यालय, विवा कॉलेज, डहाणू चित्रकला महाविद्यालय, रचना चित्रकला, वासिंद चित्रकला महाविद्यालय, मुद्रकला निकेतन या महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. 
या राज्यस्तरीय तिन्ही स्पर्धेतील निवडक कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या वेळी प्रमुख विश्वस्त के.ओ. देवासी, मुख्य पदाधिकारी भरत दोषी, कार्याध्यक्ष शिरीष पाठारे, सरचिटणीस विजय वर्तक, संयुक्त चिटणीस जयंत देसले, अजय उसनकर, सुभाष गोंधळे उपस्थित होते. शिरीष पाठारे यांनी प्रास्ताविकात असे सांगितले की, चित्रणात वापरलेले रंग, शैली याचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. प्रमुख पाहुणे भरत दोषी यांनी सांगितले की, राज्यस्तरीय स्पर्धा 13 वर्षे भरवीत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची कला दाखवण्यास उत्तेजन मिळत आहे. कलावंत स्वतःसाठी जोवर कलाकृती घडवीत नाही, तोपर्यंत तो कलावंत होत नाही. कलानिर्मिती केली तरच तो भविष्यात मोठा कलावंत होईल. आभार सरचिटणीस विजय वर्तक यांनी मानले; तर वसई-विरार महापालिकेने अर्थसाह्य करून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मदत केली. 
परीक्षक म्हणून प्रदीप कांबळे, संजय महाडिक, राहुल कांबळे, प्रदीप राऊत, अमोल पवार, वैभव ठाकूर यांनी काम पाहिले; तर प्रदर्शनाची मांडणी सागर पवार, प्रवीण शिंदे, चार्ली कोरिया यांनी केली. 

"विवा'चा वाळूशिल्पातून संदेश 
विरारच्या विवा महाविद्यालयाने वाळूशिल्प स्पर्धेत स्त्री-भ्रूणहत्ये विरोधात शिल्प साकारले होते. लहान अर्भक एका वृक्षाच्या बेचकीत "मला वाचवा' अशी साद देत आहे, अशी प्रतिकृती तयार करण्यात आली होती. हे पाहण्यासाठी वसईच्या सुरूच्या बागेतील समुद्रकिनारी नागरिकांनी गर्दी केली होती. 

Web Title: student give message from sand art