आरटीई प्रवेश अर्जाच्या अडचणींमुळे विद्यार्थी-पालक हैराण! वाचा संपुर्ण बातमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियमाअन्वये (आरटीई) प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यासाठी राज्यभरातील पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे; परंतु संकेतस्थळावर अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी येत असून, घराचे लोकेशन निश्‍चित होत नसल्याने पालक हैराण झाले आहेत. 

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियमाअन्वये (आरटीई) प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यासाठी राज्यभरातील पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे; परंतु संकेतस्थळावर अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी येत असून, घराचे लोकेशन निश्‍चित होत नसल्याने पालक हैराण झाले आहेत. 

#NPR बद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये ठरलं... वाचा बातमी

खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीई कायद्यानुसार 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या कायद्यामुळे दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे अनेक पालक आरटीई प्रवेशाची आतुरतेने वाट पाहत असतात. 12 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अवघ्या 10 दिवसांत राज्यात एक लाख 54 हजार 165 अर्ज आले आहेत. त्यात मुंबईतील 8218 अर्जांचा समावेश आहे. 

ही बातमी वाचा - पु,ल,देशपांडे अकादमीचे कलादालन तोट्यात

संकेतस्थळावरील काही तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरताना मोबाईलवर संदेश येत नसल्याने पालकांना त्रास सहन करावा लागला आहे. संदेशाअभावी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने पालक संताप व्यक्त करत आहेत. अर्ज भरण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि अर्ज क्रमांक, पासवर्ड जतन करून ठेवल्यानंतरही निवासस्थानाचे "लोकेशन' द्यावे लागत आहे. ठिकाण देणे अशक्‍य झाल्याने अनेक पालक अर्ज भरू शकले नाहीत. याबाबत शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

तांत्रिक अडचणीमुळे एसएमएस बंद 
आरटीई प्रवेशाचा नोंदणी अर्ज भरल्यानंतर पालकांना मोबाईलवर अर्ज क्रमांक आणि पासवर्डचा एसएमएस मिळणे अपेक्षित आहे. परंतु तांत्रिक अडचणींमुळे पालकांना मोबाईलवर संदेश येत नसल्याचे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाने संकेतस्थळावर दिले आहे. तांत्रिक अडचणींमुळे पालकांनी नवीन नोंदणी केल्यानंतर स्क्रीनवर येणारा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड जतन करून ठेवल्यास पालकांना अर्ज भरता येईल, असे स्पष्टीकरण विभागाने दिले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student parent frustrated with RTE admission difficulties