प्रेम प्रकरणांमुळे विद्यार्थी शाळेत राहिला गैरहजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

मुंबई - मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट यामुळे शालेय वयातच, अगदी सातवी-आठवीतच विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रेम प्रकरणांचे प्रमाण वाढू लागले आहे. पौगंडावस्थेतील प्रेम प्रकरणांमुळे अभ्यासावर अनिष्ट परिणाम होतो. शीव येथील एका शाळेतील सतत गैरहजर राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात आले. तेव्हा प्रेम प्रकरणातून तो शाळेत येत नसल्याचे समोर आले.

नववीत शिकणारा १४ वर्षांचा मुलगा काही महिन्यांपासून शाळेत सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याबद्दल माहिती घेतली आणि समुपदेशकांनी त्याच्याशी संवाद साधला. त्याने सांगितलेल्या कहाणीमुळे समुपदेशकही थक्क झाले. शाळेतील एक मुलगी प्रेमसंबंधासाठी आपल्यावर दबाव टाकत होती. तिच्या मैत्रिणीही सतत चिडवायच्या. या प्रकाराला कंटाळून शाळेत गैरहजर राहत असल्याचे त्याने समुपदेशकांना सांगितले.

सातवी-आठवीतील मुला-मुलींमध्ये काही वर्षांपासून प्रेम प्रकरण होण्याचे प्रमाण वाढले आहे. बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड नसेल, तर आपल्यातच काहीतरी उणीव आहे, असा न्यूनगंड त्यांच्यात तयार होत आहे. याचा अनिष्ट परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत आहे. काही मुले-मुली तर आवडत्या पार्टनरसाठी चिडवाचिडवीचा अतिरेक करतात. या प्रकाराला वैतागून काही विद्यार्थी गैरहजर राहतात; मात्र त्यांच्या पालकांना याची कल्पना नसते, असे मुंबईतील दोन प्रतिष्ठित शाळांमध्ये समुपदेशिका म्हणून कार्यरत असलेल्या मानसोपचारतज्ज्ञ प्राजक्ता भाटकर यांनी सांगितले.

मार्गदर्शन, संवाद आवश्‍यक
विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर अनेक विद्यार्थी आपल्या भावनांना वाट करून देतात. त्यामुळे पौगंडावस्थेतील स्वाभाविक नैसर्गिक आकर्षणाच्या भावनांना योग्यपणे कसे हाताळावे, याबाबत समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. पालकांनीही त्यांच्याशी मनमोकळेपणे संवाद साधल्यास गुंतागुंत रोखण्यास मदत होऊ शकते, असे शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितले.

Web Title: Students absent in school due to love affairs