शिक्षक संपावर; विद्यार्थी वर्गावर!

नीलेश माेरे
Wednesday, 8 January 2020

सर्व तासिका सुरळीत; आपत्ती व्यवस्थापनाच्या धड्याचा उपयोग

मुंबई ,घाटकोपर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध म्हणून बुधवारी (ता. ८) विविध संघटनांनी देशव्यापी संपाची हाक पुकारली होती. संपामध्ये शिक्षकांच्या संघटनाही सहभागी झाल्याने मुंबईतील काही शाळा बंद ठेवाव्या लागल्या; मात्र घाटकोपर पूर्वेतील शिवाजी शिक्षण संस्थेची मल्टिपर्पज टेक्निकल हायस्कूल शाळा अपवाद ठरली. संपामुळे सकाळच्या सत्रात एकही शिक्षक हजर नसल्याने चक्क विद्यार्थ्यांनीच शाळा चालवली. विद्यार्थीच शिक्षक झाल्याने सर्व तासिका सुरळीत पार पडल्या.

मोठी बातमी : 'मनसे'चा मोठा चेहरा आता येणार जनतेसमोर, मनसेत आनंदी आनंद..

संपामुळे सकाळी शाळेतील शिक्षक न आल्याने  दहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शरद फाटक यांना आम्हीच वर्ग चालवतो, अशी विनंती केली. ती मान्य झाल्यानंतर शाळेतील हुशार विद्यार्थ्यांनी तासिकेप्रमाणे विषय आणि वर्ग वाटून घेतले. शिक्षकांच्या भूमिकेत जात त्यांनी मुलांना शिकवले. विशेष म्हणजे शाळेत दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनांतर्गत विविध बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. त्याअंतर्गत रेल्वे बंद, वाहतूक ठप्प, आंदोलनामुळे शाळेत पुरेसे अथवा एकही शिक्षक न आल्यास पालक येईपर्यंत विद्यार्थ्यांनी सुरक्षित वर्गात कसे बसावे, ई-लर्निंगची यंत्रणा सुरू करणे, हुशार विद्यार्थ्यांनी वर्गात जाऊन मुलांना शिकवणे आदींचे धडे देण्यात आले हाेते. त्याच मार्गदर्शनाचा उपयोग करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत संपूर्ण शाळा व त्यातील शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांनी नियमितपणे सुरू ठेवले होते.

मोठी बातमी : शेतकरी कर्जमाफीवर राज्यपाल कोश्यारी म्हणतात...

सब कुछ विद्यार्थी!

दहावीतील गौरी जाधव हिने मुख्याध्यापकाची जबाबदारी सांभाळली. अथर्व शेळकेने उपमुख्याध्यापक म्हणून भूमिका निभावली. विद्यार्थ्यांनी तब्बल २८ वर्गांतील सर्व तासिका नियमितपणे पार घेतल्या. ३६ विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली. बुधवारी संपामुळे शिक्षक शाळेत आले नाहीत; मात्र आम्ही दोन वर्षे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत जे मार्गदर्शन केले त्याचा त्यांनी आज उपयोग केला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले, अशी प्रतिक्रिया संस्थेचे कार्याध्यक्ष शरद फाटक यांनी दिली.

students handled full day morning school in the absence of teachers on bharat bandh


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students handled full day morning school in the absence of teachers on bharat bandh