लॉकडाऊनमध्येही IIT ची पोरं मालामाल; प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना कोटींचे पॅकेज

तेजस वाघमारे
Thursday, 3 December 2020

देशभरातील आयआयटीमध्ये मंगळवार (ता.1) पासून प्लेसमेंट सुरू झाल्या आहेत. प्लेसमेंटमध्ये झालेल्या मुलाखतींना दुसर्‍या दिवशीही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला

मुंबई : देशभरातील आयआयटीमध्ये मंगळवार (ता.1) पासून प्लेसमेंट सुरू झाल्या आहेत. प्लेसमेंटमध्ये झालेल्या मुलाखतींना दुसर्‍या दिवशीही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई आयआयटीमध्ये यंदा 35 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. टेक्सास इन्स्ट्रुमेंट, गुगल, मायक्रोसॉफ्ट, क्वॉलकॉम, मास्टरकार्ड आणि बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात नोकरीच्या ऑफर्स विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.

आयआयटी मुंबईत पहिल्या दिवशी नेदरलँडच्या ऑप्टिव्हर या कंपनीकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय नोकर्‍यांची संधी विद्यार्थ्यांना देऊ केली. त्या खालोखाल जपानची होन्डा आर अ‍ॅण्ड डी, तैवानची टीएसएमसी या कंपन्यांनी सर्वाधिक नोकर्‍या दिल्या. पहिल्या दिवशी तब्बल 313 विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळाल्या. यामध्ये सोनीने सर्वाधिक 1.63 कोटीचे वार्षिक पॅकेज दिले. त्याखालोखाल होन्डा आर अ‍ॅण्ड डी या कंपनीने 82 लाख, एनईसी कंपनीने 49.24 लाख तर टीएसएमसी या कंपनीने 20.70 लाखाचे वार्षिक पॅकेज विद्यार्थ्यांना दिले.

महत्त्वाची बातमी : अभिनेत्रीचा मास्क काढून शिवसैनिक उर्मिला यांचा योगी आदित्यनाथ यांना "जय महाराष्ट्र"; मातोंडकर ऍक्शन मोडमध्ये

पहिल्या दिवसाप्रमाणे बुधवारी (ता.2) दुसर्‍या दिवशीही विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजच्या नोकर्‍या मिळाल्या. दुसर्‍या दिवशी झालेल्या प्लेसमेंटमध्ये 64 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नोकर्‍या मिळाल्या. जपानच्या सिसमेक्स कॉर्पोरेशनकडून आंतरराष्ट्रीय नोकर्‍या विद्यार्थ्यांना मिळाल्या. ओरॅकल, अमेरिक एक्स्प्रेस आणि बजाज ऑटो या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर नोकर्‍या विद्यार्थ्यांना मिळाल्या.

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्लेसमेंटवर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र तरीही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्वाधिक नोकर्‍या या आयटी, सॉफ्टवेअर, कोअर इंजिनीअरिंग आणि कन्स्लटिंग या क्षेत्रात मिळाल्याचे आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

students of IIT gets massive packages during lockdown amid corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students of IIT gets massive packages during lockdown amid corona