राजस्थानात अडकलेले ठाणेकर विद्यार्थी परतले

दीपक शेलार
Saturday, 2 May 2020

लॉकडाऊनमुळे कोटा (राजस्थान) येथे अडकलेले ठाणे जिल्ह्यातील मेडिकलचे 144 विद्यार्थी शुक्रवारी रात्री एसटी बसने ठाण्यात स्वगृही परतले. या विद्यार्थासाठी धुळे एसटी विभागाच्या बस पाठवण्यात आल्या होत्या. त्यातील 7 बस राजस्थानवरून ठाण्यात आल्या. या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या घरवापसीमुळे पालकवर्ग आनंदित झाला आहे. 

ठाणे : लॉकडाऊनमुळे कोटा (राजस्थान) येथे अडकलेले ठाणे जिल्ह्यातील मेडिकलचे 144 विद्यार्थी शुक्रवारी रात्री एसटी बसने ठाण्यात स्वगृही परतले. या विद्यार्थासाठी धुळे एसटी विभागाच्या बस पाठवण्यात आल्या होत्या. त्यातील 7 बस राजस्थानवरून ठाण्यात आल्या. ठाण्यात दाखल झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यानंतर सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या घरवापसीमुळे पालकवर्ग आनंदित झाला आहे. 

नक्की वाचा : मुंबई-पुणे शहरांमध्ये अडकलेल्यांसाठी महत्त्वाचा खुलासा

राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थी वैद्यकीय प्रशिक्षणासाठी गेले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व विद्यार्थी अडकले. याच दरम्यान या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एसटी बसची व्यवस्था केली होती.

त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील 144 विद्यार्थ्यांसाठी धुळे विभागाच्या 7 बस राजस्थान येथे गेल्या. एका बसमध्ये 20 ते 22 विद्यार्थ्यांना घेऊन या एसटी बस शुक्रवारी सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत ठाणे, खोपट एसटी स्थानकात आल्या. 

क्लिक करा : पालघर हत्याप्रकरणातील आरोपी कोरोना पॉझिटिव्ह

बसस्थानकात विद्यार्थ्यांची तपासणी
   राजस्थानमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची बस स्थानकातच महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एसटी बसने ते राहत असलेल्या ठिकाणी सोडण्यात आले. हे सर्व विद्यार्थी ठाणे शहरासह नवी मुंबई, भिवंडी, बदलापूर आणि कल्याण परिसरातील आहेत. त्या विद्यार्थ्यांची तपासणी करून सर्वांना होमक्वारंटाईन राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students from Thane who were Stucked in Rajasthan returned