शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना भररस्त्यात बसमधून उतरवले! 

दीपक शेलार  
बुधवार, 5 डिसेंबर 2018

ठाणे - सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, असे सरकारचे धोरण असताना शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांचा शिक्षण हक्क हिरावून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील नामांकित वसंतविहार शाळेच्या व्यवस्थापनाने केवळ वाहन शुल्क आगाऊ भरले नाही, या कारणास्तव विद्यार्थ्यांना भररस्त्यात बसमधून उतरवले. याबाबत अनेक पालकांनी तक्रारी केल्या आहेत. पहिल्या सहामाहीचे नोव्हेंबरपर्यंतचे शुल्क भरले असताना दुसऱ्या सहामाहीच्या आगाऊ शुल्कासाठी तगादा लावला जात असल्याचे पालकांनी सांगितले. 

ठाणे पश्‍चिमेकडे वसंतविहार स्कूल ही नामांकित शाळा आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी या शाळेच्या अनेक बस आहेत. या बसचे शुल्क पालकांकडून दोन सत्रांत आगाऊ घेतले जाते. त्यानुसार शाळा 500 मीटर ते 1 किमी अंतरासाठी दरमहा बस शुल्क म्हणून 1300 रुपये आकारले जातात. अशा अंतरानुसारच पालकांकडून पहिल्या सहामाहीचे नोव्हेंबरपर्यंतचे सरासरी शुल्क घेण्यात आले आहे; मात्र काही पालकांकडूनही सहा महिन्यांचे 9 हजार 840 रुपये घेतले असतानाही केवळ शुल्क भरण्यास विलंब झाल्याने त्यांच्या मुलांना शाळेच्या बसमधून उतरवण्यात आले. वास्तविक, पालकांनी शुल्क भरण्यात दिरंगाई केली म्हणून त्याची शिक्षा पाल्यांना का? शाळा व्यवस्थापनाने या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कावर गदा आणल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्‍त केले जात आहे. 

शाळा व्यवस्थापनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ 
या प्रकाराबाबत शाळा व्यवस्थापनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, पहिल्या दिवशी कुणीही प्रतिसाद दिला नाही. मंगळवारी पुन्हा संपर्क साधल्यावर कार्यालयातील कर्मचारी महिलेने प्राचार्य कन्नन यांना जोडून देण्याच्या निमित्ताने फोनच कट केला. त्यानंतर पुन्हा संपर्क केल्यावर नाव न सांगता त्या महिलेने विद्यार्थ्यांच्या पालकांना शुल्क आगाऊ भरण्याबाबत सूचना दिली असल्याचे सांगून यासंदर्भात प्राचार्यच अधिक भाष्य करू शकतील, असे नमूद केले. 

कार्यशाळेचा उपयोग काय? 
बालहक्क संरक्षण आयोग आणि सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जुलैमध्ये याच शाळेत 300 मुख्याध्यापकांसाठी विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि बालकांचे संरक्षण या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेत दृक्‌श्राव्य माध्यमाद्वारेही सादरीकरण केले होते; मात्र तरीही केवळ शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना रस्त्यावर सोडून बसचालक निघून गेल्याने संताप व्यक्त होत आहे. अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार केला जात नसेल तर कार्यशाळेचा उपयोग काय, असा सवाल पालकांकडून केला जात आहे.

Web Title: students were taken out of the bus due to not paying the fee