सफाळेत 'अभ्यासाच्या फेरी'तून मिटवली जातेय शिक्षणाची दरी

जतिन कदम
Thursday, 5 November 2020

पाठ्यपुस्तकातील जो घटक कठीण आहे त्याविषयी मार्गदर्शन केले जाते. ज्यांच्याकडे फोन उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना आठ दिवसांचा अभ्यास दिला जातो.

सफाळे : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंबिली जात आहे. ही शिक्षण पद्धती शहरी, निमशहरी भागांमध्ये प्रभावी ठरत असली तरी ग्रामीण भागात सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत आहेत. 

अधिक वाचा :  मुंबईसह पाच शहरात पाणीबाणी उद्धभवणार, जागतिक वन्यजीव निधीचा अहवाल

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्यातील त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील शिक्षक विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक उपक्रम सफाळे केंद्रातील जिल्हा परिषद शाळा करवेलपाडा या शाळेत सुरू आहे. या शाळेतील उपक्रमशील शिक्षक दत्ता ढाकणे यांनी "अभ्यास फेरी' उपक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू ठेवला आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी पाड्यावर विद्यार्थ्यांचे अध्यापन आणि नियमित अभ्यास सुरू आहे. अभ्यास फेरी या उपक्रमाच्या माध्यमातून आठवड्यातील तीन दिवस विद्यार्थ्यांच्या भेटी घेतल्या जातात, विद्यार्थी राहतात त्या ठिकाणी जाऊन दीड ते दोन तास अभ्यास घेतला जातो. कविता, गाणी, गोष्टी, पाढे पाठांतर, प्रश्‍न-उत्तर या पद्धतीचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो. 

अधिक वाचा : अन्वय नाईक यांना सरकारकडून न्याय: सचिन सावंत

पाठ्यपुस्तकातील जो घटक कठीण आहे त्याविषयी मार्गदर्शन केले जाते. ज्यांच्याकडे फोन उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना आठ दिवसांचा अभ्यास दिला जातो. शाळेतील उपलब्ध शैक्षणिक साहित्य वापरून भाषा गणित, चित्रकला या विषयाचे अभ्यासाचे पीडीएफ फाईल झेरॉक्‍स करून विद्यार्थ्यांना दिल्या जातात. पुन्हा दुसऱ्या अभ्यास फेरीच्या वेळी मागचा अभ्यास तपासून न समजलेल्या घटकाविषयी मार्गदर्शन केले जाते. जे विद्यार्थी शाळेजवळ राहतात त्यांना शाळेच्या फळ्यावर दोन दिवसांचा अभ्यास लिहून दिला जातो. विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभ्यास फेरी उपक्रम राबवताना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जात आहे. 

अधिक वाचाः  मुख्यमंत्र्यांकडून संयम कसा बाळगावा हे शिकलो: आदित्य ठाकरे

अभ्यासाविषयी मार्गदर्शन 
आदिवासी पाड्यावर शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. अभ्यास फेरी उपक्रमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कमी करण्याचा शिक्षक प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांना-पालकांना अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले जाते. अभ्यासाच्या पीडीएफ फाईलची झेरॉक्‍स देणे, विद्यार्थ्यांच्या वहीवर अभ्यास देणे या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास पोहोचण्याचे कार्य शिक्षक करत आहेत. 

(संपादन : वैभव गाटे)

Study of students on the basis of study activities in safale


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Study of students on the basis of study activities in safale