esakal | success in stopping second wave of corona in dharavi which is hotspot

बोलून बातमी शोधा

Dharavi-Slums-Corona

हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात यश

sakal_logo
By
मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नवे रुग्ण आणि मृत्यूचे थैमान घातले. दुसऱ्या लाटेला धारावीत मात्र प्रवेश करता आला नाही. पालिका प्रशासनाने राबवलेल्या विविध उपाय योजनांमुळे धारावीत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात यश आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे धारावीत हाहाकार उडाला होता. रुग्णांसह रुग्ण दगावण्याची संख्या ही मोठी होती. ही लाट थोपवण्यासाठी 'धारावी पॅटर्न' राबवावा लागला. याची दखल जगभरात घेण्यात आली. मात्र तोपर्यंत धारावीत रुग्ण संख्येने कळस गाठला होता तर मृतांचा आकडा भयावह वळणावर पोहोचला होता.

यावर्षी साधारणता फेब्रुवारीच्या शेवटी कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर धारावीत पुन्हा एकदा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत होती. दुसऱ्या लाटेचा विनाशरूपी परिणाम पाहता धारावीत ही लाट अधिक जीवघेणी ठरण्याचा धोका होता. त्यामुळे दुसरी लाट थोपवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

हेही वाचा: 'या' दोन विभागातील रुग्णवाढीचा दर 1 टक्क्यांच्या वर

धारावीमध्ये कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी पालिकेने टेस्टिंगसाठी होम सर्व्हिस सुरू केली आहे. मोबाईल व्हॅन टेस्टिंगच्या माध्यमातून हाय रिस्क व्यक्तींची चाचण्या सुरू करण्यात आल्या. धारावीमधील कामगार वर्ग मोठ्या संख्येने असल्याने काम जाईल या भीतीने कुणीही क्वारंटाईन व्हायला तयार नव्हते. त्यामुळे धारावीसह माहीम आणि इतर परिसरात घराघरात मोठ्या प्रमाणावर विशेष चाचणी शिबिरांचे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

धारावीत परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने राहतो. पहिला लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक कामगारांनी आपल्या गावची वाट धरली होती. यापैकी बहुतांश कामगार पुन्हा धारावीत दाखल झाल्याने संसर्ग अधिक पसरण्याची भीती होती. हा संसर्ग रोखण्यासाठी अशा कामगारांच्या चाचण्या करण्यावर अधिक भर देण्यात आला. संशयित रुग्णांना घरी तर पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाईन सुरू करण्यात आले.

हेही वाचा: १८ वर्षावरील लसीकरण; पहिल्या दिवसाचं उद्दिष्ट पूर्ण, 992 जणांनी घेतली लस

पालिकेच्या जी उत्तर विभागात धारावी, दादर, माहिमसारखा दाटीवाटीचा परिसर येतो. या परिसरात बाजार आणि व्यवसायिक परिसर मोठा असल्याने लाखो लोकं ये-जा करतात. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या 'जी-उत्तर' विभागाने धारावीसह दादर, माहीम भागातील बाजार, महत्वाच्या चौकात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर मोबाईल चाचणी शिबिरे सुरु केली. चाचण्यांसाठी मोबाईल व्हॅन तयार करण्यात आल्या आहेत. बाधित सापडलेल्या परिसरात व्हॅनच्या माध्यमातून हाय रिस्क व्यक्तींच्या चाचण्या मोफत करण्यात येत आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांना चाचणी करण्यासाठी बाहेर जाण्याची किंवा आपला अतिरिक्त वेळ देण्याची गरज नाही. धारवीत सध्या 15 शिबिर घेण्यात येत असून हाय रिस्क संपर्क झालेल्या व्यक्तींची चाचणी करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार या शिबिरांची संख्या ही टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे.

(संपादन- पूजा विचारे)

success in stopping second wave of corona in Dharavi which is hotspot