वेटरपासून निर्यातदारापर्यंत प्रवास 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

राजेंद्र जासूद यांची यशोगाथा; आता गरिबांसाठी रुग्णालय, महाविद्यालय उभारणार 
 

मुंबई ः जेमतेम दहावीपर्यंत शिकलेल्या आणि टाटा मोटर्समध्ये वेटरची नोकरी केलेल्या राजेंद्र अशोक जासूद यांनी त्यानंतर 20 वर्षांतच स्वतःचा व्यवसाय उभारून परदेशात पकड बसवली. जिद्दीने प्रामाणिक प्रयत्न केले तर कोणत्याही व्यवसायात यश मिळते, त्यामुळे कसोशीने प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला आहे. सामाजिक जाणिवेचे भान ठेवून गरिबांसाठी रुग्णालय व महाविद्यालय उभारण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. 

ग्रामीण भागात जन्मलेल्या-वाढलेल्या राजेंद्र जासूद यांना उच्चशिक्षण घेण्याची इच्छा होती; मात्र बहीण-भावाची तसेच घराची जबाबदारी उचलण्यासाठी त्यांनी वेटरची नोकरी सुरू केली. अनेक व्यावसायिकांनी शून्यातून विश्‍व निर्माण केल्याची उदाहरणे त्यांनी वाचली होती. त्यामुळे त्यांनीही उद्योग उभारण्याचे स्वप्न मनाशी ठेवले. एके दिवशी माझीदेखील कंपनी असेल, मीदेखील मोठा होईन, अशी जिद्द ते बोलून दाखवत; अशा वेळी मात्र आजूबाजूचे लोक त्यांची टिंगल उडवत. तुझ्या डोक्‍यावर परिणाम झाला का, स्वतःची लायकी बघ आधी, असे टोमणे त्यांना ऐकावे लागले; मात्र स्वप्न खरे करण्याची जिद्द असल्याने त्यांचा स्वतःवरचा विश्‍वास केव्हाही ढळला नाही. 

मित्रांनी सुचवलेले पर्याय तपासून त्यांनी प्रथम कमी भांडवलाच्या जोरावर घरोघरी दूध टाकण्याचा व्यवसाय केला; मात्र यात एका मर्यादेपर्यंतच वाढीची संधी असल्याने त्यांनी पुढे भंगाराच्या (स्क्रॅप मार्केट) व्यवसायात लक्ष घातले व त्यात जम बसला. मग रांजणगाव एमआयडीसीमध्ये कंपनीच्या बांधकामाचे काम मिळाले. ती संधी त्यांनी सोडली नाही. नंतर पुण्यात खराडी नॉलेज पार्क व क्‍लॉक टॉवर अशा दोन आयटी कंपन्या बांधल्या. परदेशात स्क्रॅप मार्केटला मोठी संधी असल्याचे जाणवल्याने त्यांनी तेथेही पावले टाकली व नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. सध्या मंदीमुळे व्यवसायावर परिणाम झाला असला, तरी या व्यवसायात चांगलीच संधी आहे. आखाती देशात ट्रान्सफॉर्मर तोडण्याचा परवाना असलेल्या तिघांपैकी माझी कंपनी एक आहे. आता मला माझ्या सिद्धिविनायक ग्रूपचा व्यवसाय जगभर न्यायचा असून जास्तीत जास्त देशांमध्ये गोदामे आणि कार्यालये असावीत हे माझे ध्येय आहे, असे ते सांगतात. 

या व्यवसायातही फसवणूक होतेच. आधीच पैसे घेऊन माल वेगळाच देतात, पार्टी पळून जाते, खराब दर्जाचा माल देतात, असे अनेक प्रकार होतात. आता ही फसवणूक कशी टाळावी याचे ज्ञानही अनुभवाने मिळाले. शिक्षण हा यशाचा पाया आहे, माझे शिक्षण कमी असले तरी आत्मविश्‍वास व जिद्द होती, त्यामुळे आता सरावाने मला सर्व अत्याधुनिक साधने हाताळता येतात व मोठमोठे व्यवहारही करता येतात, असेही राजेंद्र जासूद यांनी सांगितले. मी प्रामाणिकपणे व जिद्दीने काम केले व नशीब मला साथ देत राहिले. त्याचप्रमाणे तुम्ही एवढी कठोर मेहनत करा, की तुमची साथ देणे नशिबालाही भाग पडेल, असेही ते तरुणांना आवर्जून सांगतात. 

व्यसनापासून दूर राहा! 
आपण समाजाचेही काही देणे लागतो, हे ऋण फिटणार नाही, ही जाणीव असल्याने त्यांनी नियमितपणे समाजसेवाही केली. गरजू विद्यार्थ्यांना-गरीब रुग्णांना मदत, यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात. गरिबांसाठी मोफत रुग्णालय व होतकरू विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय उभारण्याच्या प्रकल्पावर काम सुरू आहे असे राजेंद्र जासूद म्हणाले. व्यसनामुळे कुटुंबाची वाताहत होताना मी स्वतः पाहिले आहे, त्यामुळे व्यसनांपासून दूर राहा, असा कळकळीचा सल्लाही ते तरुणांना देतात. 

हेही वाचा...मध्य रेल्वे म्हणते, प्रवाशांच्या पिशव्यांमुळे रेल्वेला लेटमार्क


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: success story of rajendra ashok jasud