esakal | डॉक्टरांची कमाल! तुटलेला हात पुन्हा रुग्णाच्या शरीराला जोडला

बोलून बातमी शोधा

Surgery
डॉक्टरांची कमाल! तुटलेला हात पुन्हा रुग्णाच्या शरीराला जोडला
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी एका तरुणाच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. या तरुणाचा हात शरीरापासून वेगळा झाला होता. ११ तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी तरुणाचा हात पुन्हा शरीराला जोडून दिला. मुंबईच्या जे जे रुग्णालयातील प्लास्टिक सर्जननी किमया केली. शरीरापासून वेगळा झालेला हात डॉक्टरांनी पुन्हा रुग्णाच्या शरीराला जोडला. वैद्यकीय इतिहासात अशी शस्त्रक्रिया क्वचितच घडते. वेळ, अपघातग्रस्त रुग्ण, या सगळ्यांची सांगड बांधत डॉक्टरांनी एका अपघात ग्रस्ताला नवजीवन दिले आहे.

डॉ.चंद्रकांत घरवाडे आणि डॉ योगेश जैस्वाल यांच्या टीमने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. गेल्या महिन्यात भायखळा रेल्वेस्थानकात एक अपघात झाला होता. या अपघातात अजितकुमार या मुलाचा हाताचा पंजा वेगळा झाला होता. शरीरापासून वेगळा झालेला हात पुन्हा जोडणं ही कल्पना सामान्य नागरिक करुच शकत नाहीत. मात्र डॉक्टरांनी ही अशक्य वाटणारी गोष्ट साध्य केली आहे. हात, हाताच्या नसा, स्नायू जोडणं आणि त्या हातावर नवी त्वचा बसवणं असं वरवर जरी शब्दात लिहिणं सोपं असलं तरी ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना तब्बल 11 तास लागल्याचं डॉक्टर योगेश जैस्वाल यांनी सांगितले.

या शस्त्रक्रियेविषयी डॉ. योगेश जैस्वाल यांनी सांगितले की, " भायखळा रेल्वे स्टेशन येथे सकाळी अजित कुमार यांचा रेल्वे अपघात झाला. या अपघातात त्यांचा हात शरीरापासून वेगळा झाला होता. सकाळी साडे आठच्या सुमारास अजित कुमार रुग्णालयात आले. शस्त्रक्रिया कक्ष बंद असल्याने अधिष्ठाता डॉ. रणजित मानकेश्वर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी मार्गदर्शन करत जी टी रुग्णालयात उपचार करण्याच्या सूचना दिल्या. अपघातग्रस्त अजितकुमार यांच्यावर  9 वाजता उपचार सुरु झाले.

हेही वाचा: अजून किती लाटा येतील ते सांगू शकत नाही - तात्याराव लहाने

कोविड काळ असल्यानं पहिली एक एंटीजन टेस्ट केली आणि ती नेगेटीव्ह आली. शरीरापासून वेगळ्या झालेल्या भागावर उपचार करण्यासाठी सुरुवातीस 6 तास महत्त्वाचे असतात. या सहा तासांना वैद्यकीय शास्त्रात गोल्डन हवर म्हणून संबोधलं जातं. पायाची एक रक्तवाहिनी वापरुन हातामध्ये पहिली रक्तवाहून घेवून जाणारी पहिली रक्त वाहिनी बनवण्यात आली. यासाठी 6 तासांचा कालावधी लागला. त्यानंतर स्नायू जोडणे, तसंच हातावर त्वचा म्हणून पोटाकडील चामडीचा भाग वापरण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेला 11 तासांचा वेळ लागला.

हेही वाचा: लॉकडाउनमुळे मुंबई लोकलचे १,२७४ कोटींचे नुकसान

यानंतर रुग्णाची परिस्थिती स्टेबल आहे का? यासाठी प्रत्येक एका तासाने रुग्णांची पाहणी केली. या काळात  अजित कुमार यांचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. त्यामुळे, एक आरटीपीसीआर चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली. रुग्ण कोरोनाग्रस्त आहे हे कळल्यानंतर रुग्णाला सेंट जॉर्ज रुग्णालयात हलवलं मात्र रुग्ण तिकडे असला तरी दिवसातून ड्रेसिंग करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम दिवसातून तिकडे जात असे आणि ड्रेसिंग करत होती. आता अजितकुमार पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, अजूनही त्याच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्लास्टिक सर्जन डॉ. चंद्रकांत घरवाडे यांनी सांगितले की, रुग्णाचा हात यशस्वीपणे वाचवण्यात आला. मात्र तो क्रियाशील होण्यासाठी पुढच्या काळामध्ये काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. साधारणपणे दोन ते तीन शस्त्रक्रिया या हातावर कराव्या लागणार आहेत. या शस्त्रक्रियेचे नियोजन सुरू केले आहे. अजितकुमार यांची प्रकृती स्थिर आहे ते हळूहळू या अपघातातून सावरत आहेत. डॉक्टरांनी माझे प्राण आणि हात दोन्ही वाचवले त्यामुळे मी डॉक्टरांचा आभारी आहे असे म्हटले.